(पाचल / तुषार पाचलकर)
कोकण रेल्वे मार्गांवरील विलवडे रेल्वे स्थानकात विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण यांच्या माध्यमातून सोमवारी दि.१८ सप्टेंबर रोजी रेल्वे स्थानकात उतरणा-या सर्व प्रवाशांना चहावाटप करण्यात आले त्याच बरोबर त्यांच्याकडून मागणी अर्ज भरून घेण्यात आले. सदर कामी मुंबई संघटनेचे सहचिटणीस गणेश गुरव व पदाधिकारी दीपक जानस्कर, सल्लागार सुहास खामकर व गणेश चव्हाण स्थानिक पातळी वरील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी खामकर व प्रगतशील शेतकरी अमरजी खामकर हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक उपाध्यक्ष सुरेश शिगम व उमेश पडिलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी स्टेशन मास्टर शिरीष जाधव यांचा सन्मान करण्यात आला. रिक्शा सेवा देणा-यांमुळे प्रवाशी आपापल्या गावी जाऊ शकतात म्हणून समस्त रिक्शा चालकांचा संघाने केलेला अभिनंदनाचा ठराव सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी रिक्शा संघटनचे उपाध्यक्ष तुषार पालकर, अध्यक्ष उमेश पडीलकर यांनी रिक्शा चालकांच्या व्यथा मांडताना त्यांचे अभिनंदन केल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगितले.
संघटनेचे सल्लागार व संघाचे अध्यक्ष श्री.सुभाष लाड यांनी “विलवडे स्टेशनकरीता आपण विविध मागण्या करीत असतांना प्रशासनाला सहकार्य करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे.यापुढे विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण,तसेच येथील रिक्शा संघटना यांच्यासोबत ‘राजापूर -लांजा तालुका नागरिक संघ’ ही संस्था असेल” अशी ग्वाहीही सुभाष लाड यांनी यावेळी दिली. सदर चहा वाटपाच्या वेळी मोठ्या संख्येने मागणी अर्ज भरून मिळाल्याचे समाधान सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले.