विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूने महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तसंच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.
“उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. “विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
राजेश टोपेंची प्रतिक्रिया
“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना जीव गमवावा लागला आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. एसीचा स्फोट झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असं राजेश टोपेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
“हे खासगी रुग्णालय असून माणिक मेहताच्या मालकीची इमारत आहे. दिलीप शाह आणि पाठक गेल्या पाच वर्षांपासून हे रुग्णालय चालवत आहेत. तीन मजल्यांची इमारत असून दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. इतर कुठे ही आग पसरली नाही. गरज आहे त्यांना इतरत्र हलवण्यात आलं आहे,” अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
“ही घटना दुर्दैवी असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे. शासकीय स्तरावरुन योग्य मदत केली जाईल. राज्य सरकार त्यांच्या दुखात सहभागी आहे. हा स्फोट कसा झाला? तो टाळता येऊ शकला असता का? याची चौकशी होणं गरजेचं आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.