(संतोष पवार / जाकादेवी)
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलसह सोशल मीडियाचे महत्व आणि वाढते प्रमाण लक्षात घेता आजच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मोहाला बळी पडू नये, गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर राहणे गरजेचे आहे, अलिकडे गैरप्रकारे पैशाची मागणी करणे, बँक आर्थिक फसवणूक, असे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अश्लीलतेही प्रमाण वाढत चालले आहेत. आपल्याला चांगले निकोप जीवन जगायचे असेल तर आजच्या विद्यार्थी-युवकांनी गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर राहण्याचे आवाहन रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात रेझिंग डे, सायबर क्राईम या विषयावर बोलताना सहाय्यक उपनिरीक्षक मनोज भोसले बोलत होते. यावेळी त्यांनी सुरक्षित जीवनासाठी मार्गदर्शक तत्वे विशद केली. मोबाईलचा अतिरेक वापर टाळा, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडू नका, अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण काळानुरूप बदलले आहे .आता घरी बसून चोरी आणि बँक खाते निकामी करण्याचे प्रकार वाढले आहेत, म्हणून विद्यार्थी युवकांनी मोबाईलचा वापर दक्षतेने करावा,अमली पदार्थ, व्यसनाधीनता तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या मुलांकडे असलेल्या मोबाईलचा लॉक नंबर प्रत्येक पालकांना माहिती पाहिजे. सुरक्षितेच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांनी छोटी-मोठी उदाहरण देत आपले अनुभव कथन केले. कोंकणातील विद्यार्थी फार हुशार आहेत.असे असले तरी एमपीएससी ,यूपीएससी परीक्षेमध्ये जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. एमपीएससी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपले करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.समृद्ध जीवनासाठी व्यायाम आणि वाचन काळची गरज असल्याचे ते बोलले.यावेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे तसेच खालगावचे बीट अंमलदार किशोर जोशी, रागिनी सावंत, ए. व्ही.मोहिते, शिक्षण संस्थेचे संचालक रोहित मयेकर, निमंत्रित संचालक प्रतिक देसाई, संकेत देसाई, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांच्यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक नितीन मोरे, संचालक रोहित मयेकर यांनीही रेझींग डे यासंदर्भात आपले विचार व्यक्त करुन ग्रामीण पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले. स्वागत मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी, सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार रोहित मयेकर यांनी मानले. हा कार्यक्रम रेझिंग डे सायबर क्राईम या विषयावर घेण्यात आला होता.