(रत्नागिरी/प्रतिनिधी)
गेले काही दिवस वाढलेले तापमान आणि अधूनमधून कोसळत असलेला अवकाळी पाऊस या साऱ्याचा फटका कोकणातील आंबा, काजू फळांना बसला आहे. अति तापमानामुळे आंबा भाजून निघत असल्याने फळगळती होत आहे. शिवाय फळांचीही अपरिपक्वता दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाने शेतकरी व बागायतदार हैराण झाला आहे.
हवामानातील उष्णता वाढ, पहाटेचे धुके, मळभ, थंडी यामुळेही फळधारणेवर व झाडांवर बुरशीजन्य आजारांचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये काजू, आंबा पिकाचे हवामानातील बदलामुळे नुकसान होऊन जवळपास 50% टक्के उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.
यासंदर्भात बागायतदारानी माहिती देताना सांगितले की, यंदा अचानकपणे जानेवारी अखेरीस या भागात सतत तीन ते चार दिवस झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर येणारे मळभ व पहाटेचे धुके व आता अचानक झालेली तापमान वाढ व पहाटे थंडी यामुळे या भागामध्ये बागेतील झाडांवरील सुपारी एवढी छोटी झालेली आंब्याची कैरी बुरशीजन्य आजाराने बाधित झाली आहे. तर उष्म्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ होतेय. तसेच गेल्या काही वर्षात काजू पिकाचे लागवड क्षेत्र वाढल्याने त्या बागायतदारांनाही उष्मावाढीचा फटका बसून झाडावरील काजू बी अवेळी कोवळी असल्याने त्यामध्ये पुर्ण वाढ झालेला गर दिसून येत नाही. त्यामुळे त्या बियांना वजन अत्यंत कमी असून दर्जाही नाही आहे. तसेच बुरशीजन्य आजारामुळे झाडांनाही धोका तयार होत आहे. अश्या प्रकारे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पाली विभागातील नाणीज, साठरे, कापडगाव, चरवेली, खानू, वळके, वेळवंड, हातखंबा या गावातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागील काही वर्षे फळपीक विमा काढूनही त्याची नुकसान भरपाईही मिळालेली नाही. केवळ कृषि विभागाचा हवामान विषयक माहितीचा ट्रिगर कार्यान्वित होत नसल्याने त्यांच्या निकषात बसत नसल्याचे कारण देत विमा मिळत नाही. त्यात गत दोन वर्षे कोरोनामुळे शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. तर यंदा चांगले पीक असताना हवामानातील बदलाचा फटका बसून सुरुवातीलाच जवळपास नुकसानी होऊन 50 टक्के उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व विमा रक्कमेचा परतावा हा तातडीने देण्याची मागणी शेतकर्यांच्याकडुन होत आहे.