(राजापूर / प्रतिनिधी)
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा वाढदिवस जानशी येथे मालवणी नाटक वस्त्रहरणच्या प्रयोगादरम्यान साजरा होणार आहे. राजापूर तालुक्यातील जानशी येथील श्री देव गोपाळ कृष्ण नाट्य मंडळाच्या रंगमंचावर स्वतः नाटककार गंगाराम गव्हाणकर यांच्या तात्या सरपंचाच्या मुख्य भूमिकेत हा नाट्यप्रयोग उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता संपन्न होणार आहे.
जगप्रसिद्ध नाटक वस्त्रहरण चे लेखक गंगाराम गवाणकर गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपल्या मूळ गावी म्हणजेच माडबन येथे वास्तव्यास आहेत. वय 83 असतानाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील अनेक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावण्याबरोबरच कोरोना कालावधीत घरी असताना त्यांनी विठ्ठल विठ्ठल हे नाटक लिहून काढले. केवळ एवढ्यावरच न थांबता स्थानिक कलाकारांना एकत्र करत श्री देव गोपाळकृष्ण नाट्य मंडळाच्या माध्यमातून हे नाटक रंगमंचावर देखील आणले, स्थानिक ठिकाणी प्रयोग करण्याबरोबरच पंढरपूर आणि सोलापूर या ठिकाणीही या नाटकाचे प्रयोग पार पाडले. या नाटकाचे स्थानिक कलावंतांच्या संचात आतापर्यंत 24 नाट्यप्रयोग या नाटकाने केले आहेत.
कोरोना कालावधीत घरी असलेल्या आपल्याच गावातील तरुणांना एकत्र करत जवळपास 50 वर्षापासून बंद असलेला रापण व्यवसाय सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ज्या शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेचा शताब्दी महोत्सव डॉक्टर गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांना आणून आणि वस्त्रहरण या नाटकाचा आपल्याच गावातील मुलांना घेऊन केलेल्या प्रयोग, स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांच्या एकजुटीतून संपन्न केलेला भव्य दिव्य शताब्दी महोत्सव सर्वांचाच उत्साह वाढवणारा ठरला आहे.
उद्या 22 जानेवारीला गवाणकर यांचा वाढदिवस असून गावातील मुलांना घेऊन वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग श्री देव गोपाळकृष्ण नाट्य मंडळ जानशीच्या रंगमंचावर होणार असून या नाटकाच्या मध्यंतरादरम्यान गंगारामजी गवाणकर यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्वतः गंगाराम गवाणकर आपल्या गावातील शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने स्वतःचेच नाटक आणि तेही स्थानिक लोकांच्या संचात बसवतात आणि स्वतःही 40 ते 45 वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच उमेदीने स्टेजवर वावरताना अनेकांनी पाहताना आश्चर्य व्यक्त केले आहे.
राजापूर तालुक्याच्या माडबण सारख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असताना देखील हा ज्येष्ठ रंगकर्मी शांत बसलेला नसून नाट्य चळवळ सुरु ठेवण्याबरोबरच गावातील तरुणांना एकत्र आणून त्यांना दिशा देण्याचे कामही करत आहेत. त्यांचा 84 वा वाढदिवस उत्साहात मात्र साधेपणाने साजरा होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.