(लांजा /सुरेश सप्रे )
आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना या देशाचे नागरिक म्हणुन आम्हाला अभिमान वाटतोच. पण देश 21 व्या शतकात झेप घेत असतानाही लांजा तालुक्यात स्वातंत्र कुठेच दिसत नाही. लांजा तालुक्याची अवस्था पाहून बेचैन व्हायला होते. माझा गाव, तालुका, जिल्हा ही आमची जन्मभूमी कर्मभूमी आहे, याचा आम्हाला नेहमीच आदर वाटतो. ही भूमी सर्वार्थाने चांगली असावी, येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात एव्हढीच अपेक्षा आहे. परंतु लांजा तालुक्याची अवस्था पाहून बेचैन व्हायला होते. भारतात आम्ही आहोत पण प्रगत भारताचे प्रतिबिंब लांजात दिसत नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी व्यक्त केली.
आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, निधी अभावी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार, सडलेल्या अवस्थेत असलेले वीज खांब, फिडर अभावी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा असे असले तरी 100 टक्के वीज बील वसुली, बकालपणा असलेले एसटी स्टँड, भंगार अवस्थेत असलेल्या एसटी गाडय़ा, खड्डेमय रस्ते, काही गावात दुरवस्था झालेल्या शाळा, लांजा शहरातील खड्डेमय राष्ट्रीय महामार्ग, अशा अनेक गोष्टी आपल्याला येथे पाहायला मिळतात.
ग्रामीण भागातील महिला भगिनी एसटी मधून उतरली तर प्रसाधन गृह नाही. अशावेळी त्या भगिनीने करायचे काय? शहरात इतर ठिकाणी ती महिला कुठे जाणार? लांजा ग्रामीण रुग्णालय शहरात तालुक्याच्या ठिकाणी आहे. पण त्याची दुरवस्था काय आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले ऑपरेशन थिएटर भंगार अवस्थेत आहे. तेथील मशिनरी सडलेल्या अवस्थेत आहे. गेली 15/20 वर्षे रुग्णालयावर झालेल्या खर्चाचे ऑडिट केले तर लांजात एक सुसज्ज रुग्णालय उभे राहिले असते. अद्यावत मशिनरी चा अभाव असल्याने येथील नागरिकांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. सरकारी हॉस्पिटल मध्ये लॅब रीपोर्ट दोन तीन दिवसानी मिळतात. ते रीपोर्ट रत्नागिरी सिव्हिल येथे पाठविले जातात. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागतो. एकतर बहुसंख्य अशिक्षित जनता खाजगी दवाखान्यात गेल्यावर लघवी, रक्त एक्सरे ईसीजी तपासा म्हणुन 1000, 1500 बिलाचा भुर्दंड बसतो. एकतर रोजगार नाही पैसे नाहीत तरीही डॉ.नी सांगितले आहे ना! अशा कचाट्यात रूग्ण सापडलेला आहे.
आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय असा सगळा मामला आहे. मी प्रशासनाच्या निदर्शनास लक्षात आणून देत आहे. पण काही हितशत्रू म्हणतील राजन देसाईला निवडणूक लढण्याची इच्छा आहे, म्हणुन हा प्रपंच केला जात आहे. पण मी नम्र सांगू इच्छितो राजकारण, निवडणूका, यापासून 2014 मी बाहेर पडलो आहे. कारण अशा कंड्या पिकवल्या की मूळ विषय बाजूला पडतो आणि आपले अपयश झाकता येते. सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता हे आत्ताचे राजकारण झाल आहे. अशी व्यथा त्यांनी बोलताना मांडली. त्यामुळे यामध्ये आपण कुठेच बसू शकत नाही. आतापर्यंत काही हितशत्रूनी राजन देसाई कसा वाईट आहे याचा बराच प्रचार केला आहेच. इतिहास नेहमीच लढणाऱ्यांचा लिहिला जातो स्वार्थासाठी चाटूगिरी करणारे यांचा नाही, असे परखडपणे स्पष्ट करत मी या तालुक्याचा नागरिक म्हणुन या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे मला पहायचे आहे. यामध्ये ना मला कोणत्या पक्षाची ना व्यक्तिची घृणा आहे. कोणतीही व्यक्ती वा पक्ष जो माझ्या तालुक्यातील विविध समस्यांवर तोडगा काढून माझा तालुका सुजलाम सुजलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल त्याला माझा सलाम व सहकार्य असेल अशी भुमिका राजन देसाई यांनी शेवटी मांडली.