(पुणे)
इमारतीवरुन उडी मारुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीनेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीतील खराळवाडीत घडली आहे. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील पिंपरी भागात राहणाऱ्या अस्मिता परशुराम धोत्रे नामक तरुणीचे एका तरुणासोबत लग्न ठरले होते. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होणार होते.
अस्मिताने १४ मार्च रोजी येरवड्यातील कल्याणीनगरमध्ये आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. १४ मार्चला अस्मिता कल्याणीनगरमध्ये मित्रांना भेटायला आली होती. त्यावेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरवातीला अकस्मित मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत मुलीचा मृतदेह येरवडा पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे होणार्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे वाग्दत्त पती जयने देखील आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.