(रत्नागिरी)
रेल्वेची धडक बसून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (११ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता करबुडे बोगदा ते भोके रेल्वे स्थानकादरम्यान उघडकीला आली. अनंत लक्ष्मण तोडकरी (७२, रा. देवळे वाणीवाडी, ता. रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत ट्रॅकमनने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, रात्रपाळीची ड्युटी करून शुक्रवारी सकाळी ट्रॅकमन भोके रेल्वेस्टेशन ट्रॅकवरून चालत घरी जात होते. त्यावेळी त्यांना छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह दिसला. मृतदेहाच्या बाजूला पडलेल्या मोबाइलद्वारे त्यांनी नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृताचे नाव समजून ओळख पटली.