(मुंबई)
गेल्या अनेक इंधन, घरगुती गॅस सिलिंडरसह आता जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. या महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. या परिस्थितीचा फटका आता रुग्णांना देखील बसला आहे. रुग्णांच्या जीव वाचविण्यासाठी लागणाऱ्या रक्ताच्या एका बाटलीची किंमत 100 रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे रक्तासाठी आता रुग्णांच्या नातेवाईकांना अधिकचे 100 मोजावे लागणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे परिपत्रक राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले आहे. यानंतर दरवाढीचा हा प्रस्ताव राज्य परिषदेने राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
२०१४ नंतर पहिल्यांदाच रक्ताच्या किंमत इतक्या मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. यामुळे रक्त आणि रक्त घटक ( रेड सेल) यांच्या किमतीत 100 रुपये वाढवण्यात आले. मात्र प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात 363 रक्तपेढ्या आहेत. यातील 76 रक्तपेढ्या या सरकारी आणि महापालिकेच्या आहेत. तर 287 रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या मालकीच्या आहेत.धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या मालकीच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या एका बाटलीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सध्या 1450 रुपये मोजावे लागत आहेत. मात्र किंमत वाढल्यानंतर हीच बाटली 1550 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.
दरम्यान राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत १ टक्के रक्त संकलित करणे गरजेचे असते. त्यानुसार महाराष्ट्रातगेली काही वर्षांपासून अपेक्षे पेक्षा अधिक रक्त संकलित होत आहे. 2021 या वपर्षात 16.73 लाख रक्त संकलित झाले. तर 2022 या चालू वर्षात 8.34 रक्त आत्तापर्यंत संकलित झालेय. मात्र राज्यात रक्ताचा तुटवडा जरी नसला तरी रुग्णांना रक्तासाठी अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.