(राजापूर)
कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे.
रिफायनरी विरोधात सोलगाव बारसु परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज (बुधवारी) रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी विरोधी समितीचे अशोक वालम, अमोल बोळे, प्रकल्प विरोधी समितीचे नेते सत्यजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. राजापूर येथील जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रातून मोर्चाला सुरूवात झाली आहे.
जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची … एकच जिद्द रिफायनरी रद्द … रिफायनरी हटवा … कोकण वाचवा …. अशा घोषणा देत नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय आहे. हातात ‘मै झुकेगा नहीं साला’ असे बॅनर घेऊन नागरिक सहभागी झाले आहेत.