(नवी दिल्ली)
मुस्लिम राष्ट्रीय मंचने सांस्कृतिक ऐक्याप्रती आपली बांधिलकी दृढ करीत अयोध्येतील श्री राम मंदिराच्या टिळा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांना त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी उत्कृष्ट दर्जाचा काश्मिरी केशर सुपूर्द केले. यावेळी आलोक कुमार यांनी, मुस्लिम राष्ट्रीय मंचने हाती घेतलेल्या स्तुत्य उपक‘माचे मनापासून स्वागत केले आणि रामललाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी शाहिद सईद यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुखाने सर्वसमावेशक दृष्टिकोनावर जोर देताना, प्रभू राम केवळ हिंदू धर्मातच पूज्य नसून, ते सर्वांचे समान पूर्वज आहेत हा विश्वास कसा अधोरेखित केला, हे शाहिद यांनी नमूद केले. मुस्लिमांना हा सामायिक वारसा स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांचा आदर वाढविण्याची विनंती केली. याशिवाय आलोक कुमार यांनी जम्मू-काश्मीरला भारताचे मुकुटमणी म्हणत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व सविस्तरपणे अधोरेखित केले. या प्रदेशातून येणार्या कोणत्याही भेटवस्तूशी संबंधित अनन्य मूल्यांवर आणि धार्मिक सीमा ओलांडणार्या विशेष बंधनावर त्यांनी भर दिला.
मुस्लिम राष्ट्रीय मंचसोबत ‘पॉझिटिव्ह काश्मीर’ यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या महिला आघाडीच्या प्रमुख शालिनी अली, पॉझिटिव्ह काश्मीरचे प्रमुख भरत रावत, एमआरएमच्या बौद्धिक सेल हिंदुस्तान फर्स्ट हिंदुस्तानी बेस्टचे प्रमुख बिलाल उर रहमान, शाकीर रझा आणि निदा जहूर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. शालिनी अली यांनी, राम हे आपले पूर्वज असून, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत, असे म्हटले. काश्मीरच्या मुस्लिमांचा असा विश्वास आहे की, रंग आणि सुगंधासाठी निवडलेला केशर रामाच्या प्राणप्रतिष्ठेची सर्वांत योग्य भेट आहे. हे एकतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे. सोहळ्यादरम्यान केशरचा उपयोग टिळा लावण्यासाठी किंवा इतर कोणत्याही उपयोगासाठी केला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.