(मुंबई/ प्रतिनिधी)
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेला मोठे भगदाड पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचा आश्रय घेतला आणि राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळ मात्र विस्तार लांबला आहे . त्यामुळे विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी त्यांच्यावर सतत टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे.
मागे विधानसभेच्या पावसाठी अधिवेशनाच्यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर “50 खोके एकदम ओके” अशा घोषणा महाविकास आघाडीने दिल्या होत्या. त्यावेळीचे अधिवेशन भांडण आणि मारामाऱ्यांनी विशेष गाजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरीवरुन चांगली झडती घेतली.
राज्य सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 50 खोके आणि एकदम ओके म्हंटले की यांना मिरच्या झोंबतात, असे पवार म्हणाले. तसेच यांना गद्दार म्हंटले तरी यांना राग येत असल्याचे पवार यावेळी भाषणात म्हणाले. तर शिंदे गटातील लोक रात्री बावचाळून उठतात आणि खोके, खोके, खोके ओरडतात. अरे कशाचे खोके आणि काय खोके? असा मिश्किल टोला अजित पवार यांनी भाषणादरम्यान लगावला.