(राजापूर)
राजापूर शहरालगतच्या कोदवली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल परिसरात मंगळवारी सकाळी लागलेल्या वणव्यामध्ये नळपाणी योजनेचे पाईप व वीजपुरवठा करणाऱ्या केबल जळून लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
कोदवली गावातील राववाडी, बौध्दवाडी व आगरवाडी या तीन वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱया जॅकवेल परिसरात मंगळवारी सकाळी अचानक वणवा लागला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती मिळताच या तीनही वाडीतील तरूणांनी तात्काळ घटनास्थळी जात बादलीतून पाणी आणून आग विझविण्याचा पयत्न केला. मात्र रखरखत उन आणि सुकलेला पालापाचोळा, लाकडे यामुळे आग अधिकच भडकत होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड बनल्याने येथील तरूण पराग भोसले याने तात्काळ राजापूर नगरपरिषदेच्या अग्नीशामक विभागाशी संपर्क साधला.
त्यानंतर काही वेळातच नगरपरिषदेचे कर्मचारी अग्नीशामक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 2 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्नीशामक बंब व ग्रामस्थांना यश आले. मात्र या आगीत जॅकवेलवरून पाणीपुरवठा करणारे पाईप तसेच वीजपुरवठा करणाऱ्या केबल जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान आगीची माहिती मिळताच पराग भोसले, निलेश महाडीक, राजा महाडीक, रितेश उगले, विकांत जाधव, अविनाश जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी सुरूवातीलाच जकवेलच्या लाईट रूमजवळील आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीमध्ये नळपाणी योजनेच्या वीजवाहीन्या व पाईप जळाल्याने या जकवेलवरून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. कोदवली ग्रामपंचायतीच्या सदस्य श्रीम. प्रणोती भोसले व ग्रामसेवकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या आगीत नळपाणी योजनेचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.