(रत्नागिरी /जिमाका)
कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी 300 कोटींची तरतूद केली आहे. जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण अशा शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर केले आहेत. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तसेच खेड मधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी साडेतीन कोटी, विभागीय क्रीडा संकुलासाठी 20 कोटी तरतूद करण्यात आली आहे. विमानतळ जमिनीच्या भूसंपादनासाठी 100 कोटी तरतूद केली असून, येत्या काही दिवसात नाईट लँडींगची सुविधा सुरु होणार आहे. वर्षभरात विमानसेवा सुरु होईल अशी ग्वाही देऊन रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हावासियांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, स्वातंत्र्य लढयात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना याप्रसंगी मी अभिवादन करतो. मागील महिन्यात काही दिवस पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने याची पूर्व तयारी चांगल्या रितीने केली होती. एनडीआरएफचे पथक देखील तैनात होते. अशा संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्था यांनी अहोरात्र काम केले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या जिल्हावासियांचेही मी आभार मानतो.
“देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी जिल्ह्यात 9 ऑगस्ट या क्रांतीदिनापासून ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहेत. लवकरच जिल्हयाच्या मुख्यालयातही सर्वात उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात येईल. जिल्हयातील विकास कामांसाठी यापूर्वी असणाऱ्या 240 कोटींमध्ये शासनाने 60 कोटी रुपयांची वाढ करुन तो 300 कोटी रुपये इतका केला आहे.
“शासन आपल्या दारी” हा उपक्रमामध्ये आतापर्यंत सर्व विभागाच्या योजनांचा लाभ 1 लाख 62 हजार 845 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्हयामध्ये जीएनएम, एएनएम, संस्कृत विद्यापीठ, 250 कोटी खर्च करुन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले आहे. 522 कोटी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. त्याचबरोबर स्किल सेंटर सुरु झाले आहे. रत्नागिरी शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपास येत आहे. येत्या दोन महिन्यात विधी महाविद्यालय देखील सुरु करणार आहोत. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आजपर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण 30 कोटी 90 लाख 10 हजार 273 एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ज्यांनी दिशा दिली त्या श्यामराव पेजेंचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विमानतळ धावपट्टीसाठी 140 कोटींचा खर्च झाला आहे. जमिनीच्या भूसंपादनासाठी 100 कोटींची तरतूद केली असून, येत्या काही दिवसात नाईट लँडीगची सुविधा सुरु होणार आहे. वर्षभरात विमानसेवा सुरु होईल. कोकणातील 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपुजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल.
1 लाख 18 हजार 422 कोटींच्या परदेशी गुंतवणुकीने महाराष्ट्र देशात प्रथम आला आहे. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना, आपल्याही जिल्हयात प्रदूषण विरहीत प्रकल्प आणण्याचा निर्धार केला आहे. वर्षभरात उद्योग विभागाच्या माध्यमातून 10 हजार कोटींचा प्रदूषण विरहीत प्रकल्प रत्नागिरीत असेल. दापोली येथे मरीन पार्क आणि रत्नागिरी येथे मँगो पार्क करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. शेती सोबतच उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्त सहाय्य योजनेंतर्गत एकूण 128 उद्योग सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. काजू बोर्ड सुरु झाला असून, दोन महिन्यात आंबा बोर्ड देखील सुरु होईल. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 2 हजार 525 लाभार्थ्यांना विविध कृषी यंत्रासाठी 5 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वन विभागाच्या माध्यमातून हिंस्त्र प्राण्यांकडून मृत्यू झाल्यास वारसांना पूर्वी 5 लाख रुपये मदत मिळायची, त्यामध्ये वाढ करुन ती 25 लाख करण्यात आली आहे.
विभागीय क्रीडा संकुल येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्णत्वास जाईल. आज चिपळूण मध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ज्या पध्दतीने सुरु होतेय, त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर आणि खेड मधील मीनाताई ठाकरे नाट्यगृह येत्या 26 जानेवारीला सुरु होईल. आपत्तकालीन परिस्थिती येऊ नये म्हणून तिन्ही जिल्हयांसाठी 3 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरीसाठी 622 कोटी रुपयांची तरतूद आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक परेड कमांडर समाधान पाटील, दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरिक्षक रमेश निकम यांच्या नेतृत्वाखालील परेडचे पालकमंत्र्यांनी निरिक्षण केले. यानंतर सुरु झालेल्या संचलनात प्लाटुन कमांडर राखीव पोलीस उपनिरिक्षक सुभाष तारये, शहर पोलीस ठाणे, संगमेश्वर पोलीस ठाणे, प्लाटुन कमांडर पोलीस उपनिरिक्षक गायत्री पाटील महिला कक्ष, प्लाटुन कमांडर पल्टन नाईक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथके तसेच पोलीस हवालदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखालील बँड पथक, अलेक्स पोलीस श्वान पथक, स्काऊट गाईड पथक, जवाहर नवोदयाच्या विद्यार्थ्यांचे पथक यांचा सहभाग होता.
पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
स्वातंत्र्य सैनिक दिवंगत मधुकर नामजोशी यांच्या पत्नी कमल नामजोशी यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मे. साई पॅकेजींगचे पुजा कदम यांची जिल्हास्तर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजक पुरस्काराबद्दल 15 हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मे. नयन गारमेंट च्या नयन सावंत यांना 10 हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
राज्य अधीस्वीकृती समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी पाटील, कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्यपदी निवड झालेले श्रीकांत चाळके, प्रणव पोळेकर आणि दिलीप देवळेकर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
नशामुक्त अभियान चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजश्री जाधव, द्वितीय सायली कदम, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रृती सागवेकर, द्वितीय क्रमांक आकांक्षा मोडक यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळयास अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.