( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले सायकल संमेलन रविवार २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत पाटणे लॉन्स, खेड येथे अतिशय उत्साहात साजरे झाले. यानिमित्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पुणे, ठाणे इत्यादी ठिकाणाहून अनेक सायकल प्रेमी जमले होते. यामध्ये पूर्ण दिवस सायकल आणि आरोग्य विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम, सादरीकरण झाले.
सायकल संमेलनाची सुरवात सकाळी सायकल फेरीने झाली. सकाळी खेड शहरात सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली. या संमेलनाला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाचे उपाध्यक्ष तसेच देश विदेशातील अनेक ठिकाणे सायकलक्रांत केलेले श्री धनंजय मदन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रत्नागिरी जिल्हा हा सायकल डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखला जावा असे आवाहन केले आणि सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आला.
भारतातील अनेक ठिकाणे सायकलने फिरलेले डॉ रामदास महाजन तसेच १३ महिन्यात २००००+ किमी सायकल चालवून भारतभ्रमण केलेले गंधार कुलकर्णी यांनी यावेळी सायकलभ्रमण या विषयावर संबोधित केले. सायकल कोणती घ्यावी व सायकल चालवताना घ्यायची काळजी याविषयी मनोज भाटवडेकर यांनी उपयुक्त माहिती दिली.
२०२० दुबई हाल्फ आयर्नमॅन फिनिशर आकाश लकेश्री यांनी ट्रायथलॉनची तयारी याविषयावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेला एसआर हा नावाजलेला किताब मिळवणारे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले, डॉ स्वप्निल दाभोळकर, प्रसाद आलेकर, विक्रांत आलेकर, रोशन भुरण, शैलेश पेठे, मिलिंद खानविलकर, केतन पालवणकर यांचा सत्कार करण्यात आला, त्यांची बीआरएम विषयी मुलाखत झाली.
दृष्टीबाधीत दिव्यांग अजय लालवाणी यांनी मुंबई काश्मिर कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास ज्यांच्यासोबत केला ते संदेश चव्हाण यांचे अनुभव कथन झाले. सायकलिंगमुळे आजारपणातून मुक्त झालेले अमित लढ्ढा, मृत्युंजय खातू, शैलेश मोरे इत्यादी अनेकांनी स्वतःचे अनुभव सांगितले. खास पनवेलहून सायकल चालवत आलेले प्रसाद कर्वे, अमेय खांडेकर, सिंधुदुर्गहून सायकल आलेले अभिषेक फाले व सहकारी, महाड येथील यश म्हसकर व सहकारी, कैसर देसाई, भारत भ्रमणासाठी सायकल चालवत निघालेले नांदेड येथील शिवाजी पाटील यांनीही मार्गदर्शनपर अनुभव सांगितले. या पर्यावरणपूरक संमेलनात सर्व मान्यवरांचा वड पिंपळाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
स्वरक्षणाची पारंपारिक लाठीकाठी कला स्नेहा भाटकर यांनी सादर केली. संध्याकाळी स्लो सायकल स्पर्धा, मैदानी खेळ खेळून हसत खेळत संमेलनाची सांगता झाली. यातील विजेत्यांना सायकल साहित्य बक्षिस रुपात देण्यात आले.
जिल्ह्यातील या पहिल्या सायकल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खेड सायकलिंग क्लबचे विनायक वैद्य, प्रितम पाटणे, विनायक कुडकर, स्वरुप थरावळ, दिपक नलावडे, हेमंत चिखले, रुपल पाटणे, गौरव पिंपळकर व सहकारी, दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, संदिप भाटकर व सहकारी, चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रसाद आलेकर, डॉ तेजानंद गणपत्ये व सहकारी, राजापूर रत्नागिरीचे धिरज पाटकर व सहकारी, गुहागरचे योगेश मोरे व सहकारी इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. तसेच पराग पाटणे, पाटणे लॉन, सचिन शिर्के छाया सायकल शॉप, अयान प्रो सायकल मार्ट यांनीही सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री गोखले आणि प्रसाद देवस्थळी यांनी केले. रांगोळी सजावट सहकार्य दुर्गा कवळे, श्रावणी बांदवडेकर, आर्या कवळे, आर्या पेठे इत्यादींनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील या पहिल्या सायकल संमेलनात अनेक दिग्गज सायकल स्वारांची भेट, ओळख, मार्गदर्शन, सायकल प्रदर्शन यामुळे सर्वजण खुश झाले. आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुन तंदुरुस्त आरोग्य जगण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे.