(रत्नागिरी)
शहरातील शिवाजी स्टेडियम येथे हॉटेलचे काम सोडून गेल्याच्या रागातून दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराला तेथे जाऊन पाच जणांनी मारहाण केली. तसेच महिलेशी अश्लील वर्तन केल्याची घटना शनिवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धेश निकम, त्याचा भाऊ व अन्य तीन जण (नाव गाव माहीत नाही.) असे संशयित आहेत. याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे. सिद्धेश निकम याच्या हॉटेलमधील कामगार संदीप मौळे हा काम सोडून फिर्यादींकडे आला होता. या कारणावरून फिर्यादीच्या हॉटेलमधील किचनमध्ये असलेला कामगार संदीप मौळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी फिर्यादी महिलेने व अन्य व्यक्तींनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिद्धेशने त्या दोघांना ढकलून दिले. त्यानंतर संदीपची कॉलर पकडून त्याला बाहेर काढत असताना सिद्धेशने काउंटरवरील वस्तू ढकलून दिल्या. महिलेने प्रतिकार केला असता तिला ढकलून हॉटेलच्या काउंटरमधील १० हजारांची रक्कम काढून घेतली.
त्यावेळी महिलेचा भाऊ परिमल हा तेथे आला असता त्याला संशयितांसह चार जणांनी जमाव करून उजव्या डोळ्यावर लोखंडी जड वस्तूने मारहाण करून दुखापत केली. त्यालाही महिला सोडविण्यासाठी गेली असता सिद्धेशने ढकलून खाली पाडून शिवीगाळ करुन पाच जणांनी तेथून पळ काढला.