(रत्नागिरी)
आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या सहयोगी संस्था आयोजित पहिल्या सागर महोत्सवात अनोखी वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी विद्यार्थी, युवक आणि समस्त रत्नागिरीकरांना लाभणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये चार दिवस होणाऱ्या या महोत्सवाची जोरात तयारी सुरू झाली आहे. वाळूशिल्पामुळे या महोत्सवाची रंगत वाढणार आहे. ही वाळूशिल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार, मंडळे आणि विद्यार्थी साकारणार आहेत.
रत्नागिरीत प्रथमच सागर महोत्सवाचे आयोजित होत आहे. ओल्या वाळूला आकार देत त्यापासून साकारलेले वाळूशिल्प सर्वांचेच लक्ष वेधून घेते. अशी वाळूशिल्पे रत्नागिरीकरांना भाट्ये, मांडवी व अन्य समुद्रकिनाऱ्यांवर पाहता येणार आहेत. मातीपासून मूर्ती साकारताना कलाकारांना जेवढी मेहनत घ्यावी लागते त्यापेक्षा खूप जास्त वेळ आणि मेहनत या वाळूशिल्पांसाठी लागते.
सागर महोत्सव १३ व १४ जानेवारी २०२३ आणि २१ व २२ जानेवारी २०२३ या चार दिवशी होणार आहे. यात वाळूशिल्पांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच तज्ज्ञांसोबत पुळणी, खडकाळ किनारपट्टी व खारफुटी जंगल सफर, जागतिक कीर्तीचे लघुपट, संशोधक व तज्ज्ञांची भाषणे, छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कला महाविद्यालये, कलाकार, मंडळे यांनी वाळूशिल्प साकारण्यासाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन मो. नं. 9970056523 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. आलेल्या प्रवेशिकांमधून निवडक कॉलेज, कलाकार, मंडळांना संधी देण्यात येणार आहे.