(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रत्नागिरीतील वेरॉन कंपनी आणि मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी ही महिनाभरातच सुरू होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या तब्बल १४ वर्षे मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी बंद होती. ती आता महिनाभरात सुरू होणार असून धनंजय मिश्रा यांनी ही कंपनी ताब्यात घेतली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी मधील गेली 6-7 वर्षे बंद असलेली वेरॉन कंपनीही आता महिनाभरात सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवार 9 डिसेंबर रोजी एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदे ही माहिती दिली.
यावेळी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, भारती शिपयार्ड ही कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. त्यामागे सर्वांचा चांगला हेतू होता. मात्र त्यावेळी ही कंपनी सुरू होऊ शकली नाही. आता मी उद्योगमंत्री असताना ही कंपनी सुरू करण्याचा चांगला योग जुळून आला आहे. मुळात या दोन्ही कंपन्यांची जुनी देणी देऊन सध्याच्या मालकांनी ताब्यात घेतल्या आहेत. भारती शिपयार्ड ही कंपनी नव्याने सुरू होत असताना त्यामध्ये २ हजार ते अडीज हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. प्रथम २५० कर्मचारी घेतले जाणार असून नंतर टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे.
भारती शिपयार्डच्या नवीन मालकांना या प्रकल्पाचे आणखी विस्तारीकरण करायचे आहे. त्यामुळे कंपनी ताब्यात घेतल्यानंतर शासकीय स्तरावर ज्या काही समस्या, पूर्तता करायच्या होत्या त्या पूर्ण करण्याबाबत एमआयडीसी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा होऊन त्या समस्या दूर करण्यात येत असल्याने महिनाभरात भारती शिपयार्ड कंपनी सुरू होणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
भारती शिपयार्ड कंपनीचे आधीचे मालक होते त्यांनी ग्रामपंचायतीचे १२ लाख देणे होते. ठेकेदारांचे देणे होते. हे देणेही नवीन मालक देणार असून कोणाचे देणे राहणार नाही. वेरॉनच्या बाबतीतही आधीचे देणे भागवण्यात आले आहे. त्यामुळें आता नव्या जोमाने या दोन्ही कंपन्या स्थानिक लोकांना रोजगार देतील आणि रत्नागिरीचा औद्योगिक विकास वेगाने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वेरॉन कंपनीचे नवीन मालक गणेश तूरेराव हे वेरॉन चा विस्तार करताना दुसरे युनिट सुद्धा रत्नागिरीत सुरू करणार आहेत.