रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे फाटा येथे बुधवारी सकाळी ५.१५ वा. सुमारास विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केली, याप्रकरणी ४ जणांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सावंत, अमित पवार, अनिकेत सावंत, रुपेश सावंत (सर्व रा. कोळीसरे, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात केशव बुधाजी लेंडे (५२, रा. आगरनरळ फाटा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ते विद्युत विभागाचे कायदेशीर काम करत होते. तेव्हा संशयित त्याठिकाणी आले असता मेन लाईनवरील दुरुस्ती केल्याशिवाय गावातील दुरुस्ती करता येणार नाही, असे लेंडे यांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांचे काहीही ऐकून न घेता संशयितांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ढेरे करत आहेत.