(मुंबई)
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी अंतिम निकाल जाहीर केला. यावेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले. मात्र एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. दरम्यान, राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याबाबात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काहीही लागला असला, तरी या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की, खरा निकाल लागेल, मात्र खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना (UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.