(गुहागर)
गुहागर तालुक्यातील मौजे उमराठ गावात कला संगम समुहातर्फे या वर्षी प्रथमच नुकत्याच झालेल्या गणपती-गौरी सणामध्ये घरगुती सजावट स्पर्धा २०२३ (वर्ष पहिले – उमराठ गाव मर्यादित)आयोजित केली होती. सुरुवातीला म्हणजे गणेश चतुर्थीच्या पुर्वीच कला संगम समुहा तर्फे उमराठ गावा अंतर्गत “आपल्या लाडक्या बाप्पासाठी आरास सजवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या डेकोरेशन सहित एक मिनिटाचा व्हिडीओ व्हॉट्सॲपवर पाठवा” असे आवाहन सर्व गणेशभक्तांना कला संगम समुहातर्फे केले होते.
उमराठ गावातील १६ गणेश भक्तांनी या घरगुती सजावट स्पर्धेत भाग घेऊन आपापल्या बाप्पाचे फोटो व व्हिडीओ सजावटीसहीत आयोजक कला संगम समुहाकडे पाठवले होते. सजावट स्पर्धेतून अंतिम फेरीत निवड करून त्यामधून विजेते घोषित करणे एवढे अटी-तटीचे होते की सर्वच गणेश भक्तांनी केलेली सजावट अप्रतिम होती.
या अटी-तटीच्या सर्धेत संत गोरा कुंभार देखावा साकार करणारे श्री महेंद्र गावणंग, उमराठ धारवाडी यांना प्रथम क्रमांकाचे विजेते, स्वराज्य निर्माते शिवछत्रपती महाराज देखावा साकार करणारे श्री सुयोग आंबेकर, उमराठ खुर्द आंबेकरवाडी यांना द्वितीय क्रमांकाचे विजेते तर पश्चिम रेल्वे देखावा साकार करणारे श्री. किशोर राणे, उमराठ गोरिवले वाडी यांना तृतीय क्रमांकाचे विजेते म्हणून कला संगम समुहा तर्फे घोषित करण्यात आले.
कला संगम समुहाने कोंडवीवाडी अंतर्गत जाहीर केलेल्या स्पर्धेत १५ गणेश भक्तांनी भाग घेतला होता. त्यामध्ये सभागृहाची प्रतिकृती साकार करणारे श्री. संदेश गावणंग यांना प्रथम क्रमांकाचे, चंद्रायान साकार करणारे श्री सौरभ धनावडे यांना द्वितीय क्रमांकाचे, चालू घड्याळाची प्रतिकृती साकार करणारे श्री प्रथमेश गावणंग यांना तृतीय क्रमांकाचे आणि कु. प्रतिक कृष्णा गावणंग व कु. उमेश गावणंग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. सदर स्पर्धा आयोजित करून या वर्षी स्वर्गवासी झालेले कोंडवीवाडी उत्कर्ष मंडळाचे सल्लागार, मार्गदर्शक व कार्याध्यक्ष कै. सुरेश भिकू गावणंग यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे पंचक्रोशीत सुद्धा कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या वर्षी सर्वच स्पर्धकांनी केलेल्या आकर्षक, सुंदर आणि दर्जेदार सजावटी(डेकोरेशन) पाहायला मिळाल्या, त्याबद्दल सर्व कार्य कुशल कारागीर /कलाकार स्पर्धकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन तसेच त्यांच्या कलेला मानाचा मुजरा आणि सर्व विजेते आणि स्पर्धक कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील कला संगम समुहाचे सर्वश्वी आयोजक योगेश गावणंग, मंगेश गावणंग आणि वैभव धनावडे यांनी दिल्या आहेत.
मौजे उमराठ गावात अशा प्रकारची घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करून गावातील गणेश भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्या कला-कौशल्यांना अधिक प्रोत्साहन आणि संधी दिल्याबद्दल कला संगम समुहाचे तसेच सदर स्पर्धेत भाग घेणारे सर्व स्पर्धकांचे आणि अंतिम विजेते स्पर्धकांचे निर्मल ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी सुद्धा मनःपुर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.