(डिजि टेक)
आज-काल मोबाईल कंपनी जास्त काळ टिकणाऱ्या मोबाईलच्या बॅटरीचे वचन देतात, पण जास्तीत जास्त वर्ष गेल्यावर मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याची ओरड ग्राहकांमधून येत असते. स्मार्टफोन जसजसा जुना होतो तसतसा त्याचा बॅटरी बॅकअप कमी होत जातो. अशा वेळी फोन पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो, ज्यामुळे युजर्स कंटाळतात. जर त्या मोबाईलला चार्जिंग नसेल आणि तो बंद पडला तर आपली अनेक कामेही अडकून पडतात. पण तुम्ही स्मार्टफोनची काही सेटिंग्ज बदलून बॅटरी बॅकअप वाढवू शकता. तुम्हाला अशा काही पद्धती वापरून बॅटरीचं आयुष्य वाढू शकतं.
तुमचा स्मार्टफोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल. अति तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. तुमचा फोन टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नका. ज्यामुळे त्याच्या बॅटरीवरही परिणाम होतो. उन्हामध्ये फोन गरम होतो अशावेळी बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन काहीवेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा त्यामुळे बॅटरी नॉर्मवर येण्यास मदत होते.
तुमचा मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करा. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते. काहीवेळा सुपरफास्ट चार्जिंग करणाऱ्या कॉर्ड आणि अॅडप्टर बाजारात उपलब्ध असतात मात्र त्यांचा वापर टाळावा. लीथियम आयन बॅटरी जेवढी हळूहळू चार्ज होईल तेवढा चांगला रिझर्ट मिळेल.
याशिवाय GPS म्हणजेच तुमच्या मोबाईलचं लोकेशन जर सुरु असेल तर यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. यूजर्सनी उपयोगानंतर ताबडतोब जीपीएस बंद करावा. तसंच ब्ल्यूटूथ जीपीएसनंतर सर्वाधिक बॅटरी वापरतो. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करा.
आपल्या मोबाईलची जास्तीत जास्त बॅटरी ब्राईटनेसमध्ये जाते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या प्रकाशानुसार तुम्हाला हवा तेवढाच मोबाईलचा ब्राईटनेस ठेवावा. यातून तुमची बॅटरी तर सेव्ह होईलच आणि तुमच्या डोळ्यांना त्रास सुद्धा होणार नाही. सध्याच्या बहुतेक सगळ्या मोबाईलला ऑटोब्राईटनेसची सोय आहे ती जर तुम्ही ऑन केलात तर उत्तमच. फोनची ब्राइटनेस खूप जास्त असल्यास फोनच्या बॅटरीचा वापर वाढतो. विशेष बाब म्हणजे आता बहुतेक मोबाईल मध्ये डार्क मोड आला आहे, ज्यामुळे बॅटरी वाचण्यास खूप मदत होते.
बर्याचदा एक अप्लिकेशन उघडल्यानंतर आपण ती बंद न करता अनेक अप्लिकेशन ओपन करतो. मात्र आपणास माहिती आहे का की आधी ओपन केलेले अप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपेल. हे टाळण्यासाठी यूजर्सनी सर्व बॅकग्राउंड अॅप्स मधूनमधून बंद केले पाहिजेत.
फोनचे व्हायब्रेशन बंद करा. कॉल येईपासून ते फोनमध्ये टायपिंग करण्यापर्यंत बरेच लोक व्हायब्रेशन चालू ठेवतात. परंतु यासाठी तुमच्या फोनची भरपूर बॅटरी खर्च होते. ते बंद ठेवल्याने तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल तसेच ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळ चालेल.
फोनमध्ये काळा वॉलपेपर लावून बॅटरी वाचवता येते. वास्तविक, वॉलपेपरमध्ये जितके अधिक रंग असतील तितकी ते दाखवण्यासाठी स्मार्टफोनची बॅटरी जास्त खर्च होईल. तसेच तुम्ही डार्क मोड देखील सक्षम केल्यास बॅटरी चांगली टिकेल.
अनेकदा लोकांच्या फोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय सारख्या सेटिंग्ज नेहमी चालू असतात. हे सर्व सतत बॅटरी वापरतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तेव्हा त्यांना बंद ठेवा.
Gmail पासून Twitter आणि Photos पर्यंत, Photos सारखी ऍप्स डेटा सतत रिफ्रेश करत राहतात. यामुळे फोनची बॅटरी आणि मोबाईल डेटा दोन्ही खर्च होतो. फोनच्या सेटिंग्जवर जा, गुगल अकाउंटवर जा आणि ऑटो सिंक फीचर बंद करा.