तेजा मुळ्ये, रत्नागिरी
तुम्हाला आवडणारी गोष्ट मैत्रीत केली जात नाही असं जाणवलं तर त्यासाठी समोरच्याची अडचण, समस्या असेल हा विश्वास ठेवला जातो ते मैत्र! काय समस्या वगैरे भाग त्यापुढे, प्रथम समजून घेणे आणि विश्वास ठेवणे होणे महत्त्वाचे. सोबत होणं महत्वाचं, आधार शब्द आला की देणे घेणे आले ते नकोच , असणे एव्हढीच भावना पुरेशी. हे माझे विचार सापेक्ष आहेत. प्रत्येकाला असेच वाटेल अस नाही पण म्हणूनच हा सहज संवाद! आता वाढत्या वयात तर प्रत्येकाला मैत्र संकल्पना चिकटलेली कुठेतरी असावी. जिथे मैत्र आहे तिथे तुमचं प्रतिबिंब उमटणारा आरसा आहे. प्रतिक्रिया उमटणारा रव आहे.मन समजून घेणारा टिपकागद आहे. सोबतीची ऊब आहे. आपला आवाज ऐकणारा कान आहे.
मैत्र आयुष्यात संगीत तयार करत, मैत्र रागाला आरोह अवरोह आहेत. चीज आळवण्याची ताकद आहे , साथ- संग रहाण्याची धुंदी आहे. जीवनात अखेरपर्यंत वास्तव वा स्मृती रूपाने ऐकू येणारे स्वर हाच जीवनाधार आहे!