(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल उशिरा अचानक दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठमोठे भूकंप होत असल्याने पडद्यामागे नेमके चाललेय काय, असा प्रश्न आता जनतेला पडत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. आज रात्री ९ वाजता मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री अचानक का जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भाजप पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहेत. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आता मुख्यमंत्री राज्यातील परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेतल्यानंतर त्याचे परिणाम दिसून आले आहेत का, यासंदर्भात ही भेट होणार आहे. तसेच राज्यातील इतर राजकीय, सामाजिक परिस्थितीबद्दल भाजपचे केंद्रीय नेतृत्व माहिती घेणार असल्याचीही माहिती आहे.
दादांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याबाबत केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार आहे. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होताच इकडे अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओला ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अशा खास अंदाजात मिटकरींनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदी बसण्याची आपल्या मनातील इच्छा अनेकवेळा स्पष्टपणे बोलू दाखवली आहे. अजित पवार यांचे आक्रमक पक्षविस्ताराचे धोरण आणि मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा ही शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीने धोकायदाक ठरु शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
वर्षा बंगल्याच्या परिसरात झळकले अजित दादाचें बॅनर
अजित पवार यांचं नाव पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत… 2004 पासून हुलकावणी देत असलेली ही संधी 2-3 महिन्यांत दादांना मिळेल असं दादा गटाचे नेते म्हणतायत, कार्यकर्त्यांसाठी 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'… बघू काय होतंय.@AjitPawarSpeaks @NCPspeaks #AjitPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/z54JyQz3NW
— Vikrant Shinde (@Vikrant130801) July 21, 2023
आज 22 जुलैला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा अजित पवार मुख्यमंत्री लिहलेला बॅनर चर्चेत आला आहे. या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. वर्षा बंगलाच्या परिसरात अजित पवार मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर झळकला आहे. हा बॅनर सलीम सारंग यांच्याकडून लावण्यात आला आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार, असा आशय यावर लिहीण्यात आला आहे.