(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याच्या आधी परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तशा स्वरूपाचा आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागमोडी वळणाचा चिपळूण नजीकचा परशुराम घाट हा महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटरचा घाट आहे. गेल्या वर्षी पावसामुळे याच घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: डोकेदुखी बनली होती. याचं एकमेव कारण म्हणजे संथ गतीने सुरु असलेले घाटातील चौपदरीकरणाचे काम. कामावेळी अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर येवून वाहतूक ठप्प व्हायची. गेल्या पावसात तर आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तर घाट दोन महिने बंद करण्यात आला होता.
पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामालाही गती देत दिवस-रात्र काम सुरु ठेवण्यात आले आहे. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे.
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाटा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीचा डोंगर उतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढेगाव. त्यामुळे येथे डोंगर खुदाईसह अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवरती काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ऍथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे आहे.
परशुराम घाटात १.२० कि.मी लांबी ही उंच डोंगर रांगा खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे.
सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में. कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली होती.