(महाड)
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी काम पूर्ण होत आले होते. मात्र, पुलाचा जुना पिलर नवीन स्लॅबच्या बांधकामाला अडथळा ठरत होता तो तोडत असताना पुलाच्या स्लॅबचे लोखंडी अँगल सरकले व ते पाण्यात कोसळल्याने 15 सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या आंबेत पुलावरील वाहतूक चालू होण्यास आता आणखी काही काळ लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माणगाव येथील उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले.
या संदर्भात कार्यकारी अभियंता महेश नामदे यांनी सांगितले की, सध्या पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पुलाच्या पी पाच पीयरच्या जुन्या काँक्रिटीकरणाचा भाग रात्री कोसळला आहे. परंतु, नवीन सुरू होणाऱ्या कामास कोणताही धोका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवापूर्वी या पुलावरून वाहतुकी सुरू करण्याबाबत आता काही दिवसांचा कालावधी जावा लागणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून या पुलावरून बंद असलेली वाहतूक गणरायाच्या आगमनापूर्वी सुरू होण्याची कोकणवासीयांची आशा मावळली आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पूल वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, ऑक्टोबर 2021 मध्ये आंबेत पुलाची पाण्याखालून तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी पुलाचा भाग सुस्थितीत असल्याने पुलाच्या वरील भागाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये हा पूल धोकादायक बनल्याने त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणात पुलाचा पाया क्रमांक पाच झुकल्याचे स्पष्ट झाल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.
आंबेत पुलाच्या डागडुजीसाठी 14 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या पुलाचे काम करणाऱ्या पिलानी इन्फॉ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 15 सप्टेंबर अर्थात इंजिनिअर डे दिनी पूल चालू करण्याचे प्रयोजन ठरले होते. कोकणात गणेश उत्सव हा महत्त्वाचा उत्सव असून यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण व गुजरातहून हजारो चाकरमानी हे गणेशोत्सवाच्या काळात आठवडाभर अगोदर आपापल्या गावी दाखल होतात. मात्र, 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी म्हणजे 15 सप्टेंबरपासून हा पूल चालू करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माणगाव येथील उपविभागीय अभियंत्यांकडून सुरु होते. मात्र, अचानकपणे पुलाचा जुना कॉलम तोडायचे काम चालू असताना नवीन कामाचा काही भाग कोसळला मात्र पुलाचा पूर्ण स्लॅप कोसळल्याची जी अफवा उठवली जाते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे माणगाव येथील उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले.