मुंबईत ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाली असून मुलीने वेगळ्या धर्माच्या मुलासोबत पळून जाऊन विवाह केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या वडील आणि भावाने इतर तीन जणांच्या मदतीने या जोडप्याची हत्या करून, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या शहरात फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१७ ऑक्टोबर) रोजी मुंबईतील पूर्व उपनगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी वडील भावासह सहा जणांना याप्रकरणी अटक केली असून, अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघेजण अल्पवयीन आहेत.
करण रमेश चंद्र (२२) आणि गुलनाज खान (२०) असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्यांची नावे असून या दोघांच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील गोरा रहीद्दीन खान (५०), भाऊ सलमान गोरा, मोहम्मद कैफ नौशाद खान यांच्या सह तीन विधी संघर्ष बालकांना अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी हे उत्तरप्रदेश राज्यात राहणारे आहेत. १४ ऑक्टोबर रोजी गोवंडी पोलिसांना टेलिकॉम फॅक्टरी या ठिकाणी असलेल्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता हा तरुण धारावी येथे राहण्यास असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी अधिक माहिती काढली असता करण चंद्र असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या पत्नीसोबत राहण्यास होता. त्याची पत्नी देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या तपासात करण आणि त्याची पत्नी गुलनाज हे उत्तरप्रदेश राज्यातील बांदा जिल्ह्यात राहणारे असून, या दोघांनी वर्षभरापूर्वी मुंबईत पळून जाऊन लग्न केले. हे लग्न गुलनाजच्या वडिलांना आणि भावाला मान्य नव्हते अशी माहिती समोर आली.
पोलिसांनी तात्काळ मुलीचे पिता गोरा खान आणि भाऊ सलमान या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. करण याच्या हत्येनंतर गुलनाज हिची देखील हत्या करून मृतदेह नवी मुंबई कळंबोली येथील झाडीत फेकल्याची कबुली दोघांनी दिली. गोवंडी पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत मोहम्मद कैफ नौशाद खान यांच्यासह तीन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध हत्या, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक करून विधी संघर्ष बालकांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.