(मुंबई/किशोर गावडे)
मुंबईतील प्रसिद्ध ‘माऊंट मेरी’ जत्रेला म्हणजेच ‘मोत माऊली’च्या जत्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या जत्रेला ‘वांद्रे महोत्सव’ असंही म्हटलं जातं. ही मुंबईतील मोठी जत्रा आहे. लाखो भाविक मोत माऊलीच्या दर्शनाला येत असतात.
आज रविवारी 11 सप्टेंबर पासून माऊंट मेरीच्या जत्रेला सुरुवात होत असून हा महोत्सव 18 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या जत्रेला 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष ही जत्रा रद्द करण्यात आली होती. 2020 आणि 2021 साली कोरोनामुळे या जत्रेवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता दोन वर्षांनंतर ही जत्रा भरवण्यात येत आहे. या जत्रेला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. माऊंट मेरी चर्चमध्ये भाविक नवस मागण्यासाठी येतात आणि माऊंट मेरी समोर मेणबत्ती लावून नवस मागतात. ‘माऊंट मेरी जत्रे’चे यंदा प्रथमच युट्बूब आणि ट्विटरवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष या यात्रेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. या यात्रेला शतकाहून अधिक परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच आता ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा जत्रेला एक लाख भाविक दर्शनासाठी आणि जत्रेसाठी येतील अशी शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
या वर्षी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत रहाणार असून प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधांकडे लक्ष वेधले गेले आहे.