(नवी दिल्ली)
राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.आपल्या देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी केले. अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? हे मी पण विचारणे सोडणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले.
संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणीही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी केव्हाच घाबरणार नाही. मी संसदेत काही प्रश्न विचारले, मात्र माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे गांधी म्हणाले.
अदानी हे भ्रष्ट आहेत, लोकांनाही ते माहिती आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना का वाचवत आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला. अदानीवर झालेले आक्रमण देशावर झालेले आक्रमण असल्याचे भाजपच्या लोकांना वाटत आहे. त्यांना देश अदानी आणि अदानी देश असल्याचे वाटत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
माफी मागायला मी सावरकर नाही
या देशाने मला सर्वकाही दिले आहे. देशाने मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध जगासमोर आणणार असल्याचे गांधी म्हणाले. खासदारकी रद्द केली तरी मी घाबरणार नाही. माझे नाव गांधी आहे. मी कोणाची माफी मागणार नाही. गांधी कधी माफी मागत नाहीत. माफी मागायला मी सावरकर नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.