(पुणे)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांच्या सोबत आमची बैठक झाली होती. पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांच्या पाठिंबा होता. पण 4 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पाठींबा काढला, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली. माझ्या राजकीय गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असं शरद पवार म्हणाले.
भाजपला 2014 आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते. तो काळ वेगळा होता. पण नंतरच्या काळात त्यांनी जे सांगितलं की, ते भेटले. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा झाली ही गोष्टही खरी आहे. त्यांनी स्वत: सांगितलंय की, मी पाठींबा दिला होता. पण मी दोन दिवसांनी निर्णय बदलला. जर दोन दिवसांत निर्णय बदलला हे माहिती होते, तर फडणवीसांनी दोन दिवसांनी अशी चोरुन पहाटे शपथ का घेतली ? असा सवाल शरद पवार यांनी केला.
“आमचा त्यांना पाठींबा होता तर दोन दिवसात त्यांची सत्ता कशी गेली. त्यांना राजीनामा का द्यावा लागला ? याचा अर्थ स्पष्ट आहे. सत्तेसाठी भाजपा कुठेही जाऊ शकतो, हे एकदा समाजासमोर यायला पाहिजे होत. या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे सत्तेसाठी काहीही करु शकतात, कुठेही जाऊ शकतात, हे सगळं समजून घेण्याची ही वेळ आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.
“हा राजकीय डाव होता का? ते मला माहिती नाही. पण माझे एक सासरे देशातले उत्तम गुगली बॉलर होते. गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या बॅट्समनच्या विकेट घेतल्या होत्या. मी “आयसीसी” चा अध्यक्ष होतो. मी जरी खेळलो नसलो तरी मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? माहिती होतं. त्यामुळे फडणवीसांची विकेट गेली. मला अधिक काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असंही शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आ वासून उभा आहे. हजारो मुली, महिला बेपत्ता आहेत. अन्य विधाने करण्यापेक्षा गृहमंत्री फडणवीसांना महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा हल्लाबोल पवारांनी केला. त्यांनी राज्यातील काही जिल्हा आणि महानगरपालिकांमधील गेल्या सहा महिन्यांची बेपत्ता मुलींची आकडेवारी या पत्रकार परिषदेत मांडली. पवार म्हणाले की, ‘राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर यासारख्या शहरात एकूण 2,458 महिला, मुली बेपत्ता आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यातील आहे. बुलढाणा, वाशिम, अमरावती, रायगड, अमरावती, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया अशा पोलीस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत येणार्या 14 जिल्ह्यांमध्ये 23 जानेवारी ते 23 मे या काळात 4,431 मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या 2022-23 मे अखेर या दीड वर्षांच्या काळात एकंदरीत 6,989 मुली बेपत्ता आहेत.’
केंद्रातील मोदी सरकारवरही पवारांनी टीका केली. देशात दोन कायदे असू शकत नाही, असे सांगत मोदींनी समान नागरी कायद्याचा विषय काल पुन्हा पुढे रेटला. त्यावर पवार म्हणाले, ‘पाटणा येथे 17 पक्षांनी एकत्र येऊन बैठक घेतली. त्यावेळी मोदी अमेरिकेत होते. तेथून आल्यानंतर त्यांनी बैठकीची माहिती घेतल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय होईल या भीतीने मोदी अशा प्रकारची विधाने करत आहेत. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी समान नागरी कायदा हा विषय उपस्थित केला असे मला वाटते. केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचा विषय विधी आयोगाकडे सोपवला आहे. विधी आयोगाकडे या विषयी 900 प्रस्ताव आलेले आहेत. त्यामध्ये काय म्हटले ते माहिती नाही. विधी आयोगासारखी जबाबदार संस्था खोलात जाते, लोकांकडे प्रस्ताव मागते, त्यावर 900 प्रस्ताव येतात, याचा अर्थ या प्रस्तावातून त्यांची काय सूचना आहे ते पहिल्यांदा बघण्याची गरज आहे. समान नागरी कायद्याबाबत शीख, ख्रिश्चन आणि जैन समाज यांची भूमिका काय ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. शीख समाजाची समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची मनस्थिती नाही, असे मला कळते. विधी आयोगाने संपूर्ण अभ्यास करून सर्व माहिती देईल तेव्हा आमचा पक्ष त्याबाबत भूमिका जाहीर करील. देशात केरळपासून ते हिमाचलपर्यंत अनेक राज्यांत आज भाजपाची सत्ता नाही. ईशान्येतील छोटी राज्ये वगळता भाजपाला जनमताचा पाठिंबा नाही. गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात आमदार फोडून सत्ता आणली आहे. अन्य ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. लोक त्यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीपासून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी समान नागरी कायद्यासारखी विधाने केली जातात.
‘शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या,’ या नरेंद्र मोदींच्या विधानाचाही पवारांनी खरपूस समाचार घेतला. ‘माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला बापदादाची पुण्याई उपयोगी पडते. पण स्वत:चे कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काल केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असे मत व्यक्त करणे योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही. कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य हीदेखील संस्था आहे हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे, असेही शरद पवारांनी नमूद केले.
दरम्यान, फडणवीसांनी पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी गुगली टाकल्यामुळे सत्य बाहेर आले. अजून अर्धसत्यच बाहेर आले आहे. पण पवारांच्या गुगलीमुळे त्यांचाच पुतण्या बोल्ड झाला.’ आता अजित पवार पूर्ण सत्य बाहेर येऊन बोलतील, असा तिखट पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला. पवार आणि फडणवीस यांच्यातला कलगीतुरा आता अजित पवारांच्या कोर्टात पोहोचला आहे. या दोघांच्याही वादावर अजित पवार नेमके काय बोलतात?, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.