(पुणे)
आयुष्यभराची पुंजी जमा करत सर्वसामान्य माणूस घर बुक करतो. मात्र घर घेताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण सध्या विविध कारणांनी काही बिल्डरांचे प्रकल्प दिवाळखोरीकडे जात आहेत. त्यातील अनेक प्रकल्प बंद झाले आहेत. दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या प्रकल्पांची संख्या ३०८ आहे. त्यामध्ये लवासा, निर्मल लाइफस्टाइल, नेपच्यून डेव्हलपर्स कॉर्पोरेशन आणि लोखंडवाला-कटारिया यासारख्या दिग्गज गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे, अशी माहिती महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने दिली असून घर खरेदी करण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. यामध्ये मुंबईतील सर्वाधिक २३३ प्रकल्प असून पुण्यातील ६३ प्रकल्प आहेत.
महाराष्ट्रातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये दिवाळखोरी वाढली आहे, त्यापैकी ११५ अद्याप सुरू आहेत आणि १९३ आधीच बंद झाले आहेत. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आणि इतर पतपुरवठादारांनी या ३०८ प्रकल्पांविरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे. मुंबईमध्ये २३३, पुण्यात ६३ आणि अहमदनगरमध्ये पाच, सोलापूरमध्ये चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथे प्रत्येकी एक प्रकल्प दिवाळखोरीत आले आहे. बंद पडलेल्या १९३ प्रकल्पांपैकी १५० प्रकल्पांमध्ये ५० टक्के पेक्षा पेक्षा जास्त जणांनी फ्लॅटची बुकींग केली आहे. महारेराकडून सर्व प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी छाननी होते.