(मुंबई)
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शिष्टमंडळाने उद्योगधंद्याच्या प्रलंबित अनुदान संबंधी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
ललित गांधी यांनी यावेळी राज्यातील उद्योग प्रकल्पांचे प्रलंबित अनुदान सुमारे 9000 कोटी इतके आहे. त्यापैकी सरकारने 3000 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून 670 कोटी रुपये प्रत्यक्ष वितरित केले असल्याचे सांगून मंजूर रकमेपैकी उर्वरित 2300 कोटी रुपये एकरकमी अदा करावेत अशी मागणीही ललित गांधी यांनी केली.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारने याविषयी अनुदान लवकर वितरित व्हावी अशी भूमिका घेतली असून तात्काळ हे अनुदान वितरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मंजूर रक्कम एक अथवा दोन टप्प्यात ताबडतोब वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले जातील असे सांगितले.
ललित गांधी यांनी यावेळी नवीन व विस्तारित उद्योग प्रकल्पांच्या अनुदान योजनेच्या पात्रतेसाठीची मर्यादा कोरोना काळातील दोन वर्षाचा काळ गृहीत धरता यापुढे दोन वर्षे वाढवण्याची मागणीही केली.
तसेच औद्योगिक वसाहती मधील विविध प्रलंबित प्रश्न उद्योग जगतांच्या अन्य मागण्या संबंधी उद्योग मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊ असे आश्वासन उदय सामंत यांनी ललित गांधी यांना दिले.