उपोषणे, निष्ठा, नेम विविध कर्म केले पण मुख्य गोष्ट चुकली तर उपयोग नाही. यज्ञ कर्म केली, हृदयामध्ये फळाची आशा धरली त्यामुळे आपल्या इच्छेने जन्माची पायाभरणी केली जाते. नाना सायास करून चौदा विद्यांचा अभ्यास केला, रिद्धी सिद्धी मिळवल्या तरी सद्गुरुकृपेवाचून स्वतःचे हित होत नाही यमपुरीचा अनर्थ चुकत नाही. जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत जन्म मरणापासून सुटका नाही. गुरुकृपा नसेल तर अधोगती होते गर्भवास चुकत नाही. ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ति, भाव आणि भजन सगळं जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तो पर्यंत फोल आहे.
सद्गुरू कृपा जोडली नाही आणि भलतीकडे घरंगळला, म्हणजे अंध व्यक्तीने दलदल आणि खाचखळग्यात फसण्यासारखे आहे. डोळ्यांमध्ये अंजन घातले असता दृष्टीस पुढील गोष्ट दिसते याप्रमाणे सद्गुरु वचनाच्या ज्ञानामुळे मुळे प्रकाश पडतो. सद्गुरुविना जन्म निष्फळ आहे. सद्गुरु नसेल तर सर्व दुःखच आहे. सद्गुरु नसेल तर तळमळ नाहीशी होणार नाही. सद्गुरूच्या अभय करामुळे ईश्वर प्रकट होईल आणि संसारातील अपार दुःख नाहीसे होईल. पूर्वी थोर थोर संत महंत मुनीश्वर झाले पण त्यांनादेखील सद्गुरुवाचून ज्ञान-अज्ञानविचार समजला नाही. श्री राम आणि कृष्ण हे देखील गुरु वचन पाळण्यासाठी तत्पर होते. त्यांनी सिद्ध, साधू आणि संतांचे गुरुदास्य केले. हरिहर आणि ब्रह्मा हे सगळ्या सृष्टीचे चालक आहेत तेदेखील सद्गुरुपदी नसल्याने त्यांना महत्त्व मिळू शकले नाही. असो, त्याला मोक्ष मिळावा असे वाटते त्याने सद्गुरु करावा. सद्गुरुविना मोक्ष मिळेल हे हे कल्पांतीही घडणार नाही. सद्गुरु हे इतर गुरुसारखे नसतात. ज्यांच्या कृपेने प्रकाश आणि शुद्ध ज्ञान कसे मिळते त्या सद्गुरुची ओळख पुढच्या समासामध्ये करून घेऊया. श्रोत्यांनी ती श्रवण करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरूनिश्चयनाम समास प्रथम समाप्त
दशक पाचवे समास दुसरा गुरु ची लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ! जय श्रीराम ! जे चमत्कार दाखवतात ते स्वतःला गुरु म्हणवून घेतात पण ते मोक्ष देणारे सद्गुरु नव्हेत. सभा संमोहित करणारे, वशीकरण करणारे, जादू करणारे, चेटूक मंत्र बोलणारे, साबर मंत्र बोलणारे, कुटील अनेक प्रकारचे नाना चमत्कार कौतुकाने करणारे, असंभाव्य असे सांगणारे, औषधाचे प्रयोग करणारे, धातूपासून सुवर्ण बनवण्याचा मार्ग सांगणारे, नजरबंदी करणारे, इथे प्राप्ती करून देतो सांगणारे, साहित्य, संगीत ज्ञान असलेले, गीत, नृत्य तान, मान नाना वाद्य शिकवणारे तेही गुरु असतात. पंचाक्षरी विद्या शिकवतात, तोडगे सांगतात, ज्याच्यामुळे पोट भरते अशा विद्या शिकवतात, पोट भरण्यासाठी जातीचा विविध व्यापार शिकवतात तेही सगळे गुरूच आहेत. मात्र सद्गुरु नाहीत. आपले आई आणि वडील हे देखील गुरुच आहेत मात्र पैलपार पोहचवणारा सद्गुरु वेगळाच.
गायत्री मंत्राचा उच्चार सांगणारा तो कुलगुरू आहे, मात्र ज्ञान देऊन पैलपार पोहचवत नाही. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तो अज्ञानरूपी अंध:काराचा नाश करतो. जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य करतो. विभक्त असलेल्या देव आणि भक्ताला एकत्र आणतो तो सदगुरू. भवरूपी वाघाने उडी घालून गाय-वासरासवेगळे केले त्यांना पुन्हा एक करतो तो सद्गुरू जाणावा. वासनानदीच्या महापुरात प्राणी बुडत असताना गयावया करतो तेथे उधी घालून तारतो तो सद्गुरू जाणावा. गर्भवास, इच्छा बंधनांची बेडी यांच्यापासून सोडवतो व ज्ञान देतो तो सद्गुरु स्वामी. शब्दांचे अंतर नाहीसे करून नीजवस्तू दाखवतो तोच गुरु हे अनाथांचे माहेर आहे. सदगुरुची काही लक्षणे आपण पाहिली पुढील लक्षणे पुढील भागात!
जय जय रघुवीर समर्थ !
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127