जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, अनुमान आणि अनुभव, उधारी आणि रोकडे धन, मानसपूजा आणि प्रत्यक्ष दर्शन यामध्ये मोठे अंतर आहे. पुढच्या जन्मात केव्हा तरी उध्दार होणार हा तर उधारीचा मामला झाला, तसे नको तत्काळ लाभ झाला होऊन प्राणी संसारापासून सुटला पाहिजे. जन्म मरणाचा संशय तुटतो. याच जन्मी, याच काळी संसारापासून निराळे व्हा, मोक्ष मिळवून निश्चितपणे स्वरूपाकार व्हा. याच अवमान करील तो सिद्ध असूनही पतन पावेल. हे यथार्थ बोलणे आहे. विचारपूर्वक शीघ्र मुक्त व्हायचे .. लोकामध्ये असूनही मी पण विरहीत असणे हे योग्य आहे. देवपद हे निर्गुण आहे, देवपणामध्ये ऐक्यत्व आहे. हाच याचा पूर्ण अर्थ आहे आणि त्याच्यामुळे समाधान मिळते. देहात असूनही विदेही होणे, करूनही काहीच न करणे हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. ते फक्त जीवनमुक्तच जाणू शकतो. एरवी हे खरं वाटत नाही, अनुमानाने देखील संशय वाटतो संदेह ठेवायचा नसेल तर सद्गुरुचे वचन पाळणे आवश्यक आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सार शोधननाम समास नववा समाप्त.
दशक सहावा समास दहावा अनिर्वाच्य
समाधान विचारले असता सांगतात बोलण्यासारखे नाही. मग ते कसे आहे ते सांगावे. मुक्या माणसाने गुळ खाल्ला त्याला गोडी कशी आहे ते सांगता येत नाही आता हे मला तुम्ही पटवून द्या. मी अनुभव विचारतो आणि तुम्ही सांगतात की तो सांगता येत नाही आता मी कोणाकडे ही गोष्ट विचारू? जे जे अगम्य म्हणून सांगतात त्याची मला प्रचिती येत नाही, तो विचार माझ्या मनामध्ये बसावा असे करावे. यावर श्रोत्याच्या या प्रश्नाला कसे उत्तर देत आहे ते तत्पर होऊन ऐका. समाधानाचे जे स्थळ आहे ते केवळ अनुभव हाच आहे. ते प्रांजळ स्वरूप बोलून दाखवतो. जे शब्दाला गवसत नाही, बोलल्यावाचूनही कळत नाही, त्याची कल्पना करता कल्पनाच क्षीण होते. वेदांचे गुह्य तेच परब्रम्ह असे जाणावे.
संतांचा सहवास मिळाला असल्यास ते समजते. ते आता सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला सखोल समाधान मिळेल. हे अनुभवाचे बोल असून अनिर्वाच्य वस्तू आहे. सांगता येत नाही ते सांगणे गोडी करण्यासाठी गूळ देणे असे ते सद्गुरुवाचून होणार नाही. सद्गुरूकृपा ज्याला कळेल, जो स्वतःचा शोध घेईल, त्याला पुढे आपोआप आत्मज्ञान होईल. त्याच्यासाठी बुद्धीचा निश्चय करून आपण कोण आहोत याचा शोध घ्यावा. त्यामुळे त्याची समाधी लागेल. आपले मूळ शोधले असता आपण म्हणजे मायीक आहोत असं समजून आत्मज्ञान हेच त्याचे समाधान आहे.
आत्मा सर्वसाक्षी आहे, हे पूर्वपक्षात सांगितले आहे. त्याकडे लक्ष दिले तर तो सिद्ध होऊ शकेल. सिद्धांत काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न केल्यावर सर्वसाक्षी अवस्था प्राप्त होते आणि मग अवस्थातीत अवस्था निर्माण होते. पदार्थज्ञान नाहीसे होते तेव्हा पाहणारा म्हणून तो उरत नाही. मी पणाचा डौल नाहीसा होतो. मीपण नाहीसे झाले, हीच अनुभवाची खुण असून त्यालाच अनिर्वाच्य समाधान म्हणतात.
अत्यंत विचारपूर्वक हे सांगतो आहे परंतु मायेमुळे हे बोल फोल ठरतात. शब्द सखोल असतात कारण त्याच्यामध्ये अर्थ असतो. शब्दांमुळे अर्थ समजतो. अर्थ जर पाहिला नाही तर शब्द व्यर्थ असतात. शब्द सांगतात ते यथार्थ आहे परंतु शब्दाला त्याला काही अर्थ नसतो. शब्दामुळे वस्तू दिसते आणि वस्तू जर पाहिली वस्तू म्हणजे शब्द नाही. शब्द आहे आणि त्यातील अर्थ म्हणजे धान्य आणि शब्द म्हणजे भुसा होय! धान्यांतून भुस्कट काढून टाकायचं, तसे शब्द विसरायचे. परब्रह्माचा विचार केला तर शब्द हा पोकळ आहे बोलल्या बरोबर शब्द नष्ट होतो अर्थ हा शब्दापूर्वीचाच आहे. यामुळे अर्थाला ती उपमा देता येत नाही.
भुस्कट बाजूला सारून धान्य घ्यावे त्याप्रमाणे वाक्याला अर्थ नाही ते सोडून द्यावे आणि त्याच्यातील अर्थ अनुभवाने मिळवावा. दृष्यापेक्षावेगळे त्यालाच वाच्यांश म्हणतात, त्याचा अर्थ ओळखतो तो शुद्ध लक्ष्यांश होय. अशा तऱ्हेने आत्मसुखाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127