(नवी दिल्ली)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दौऱ्याला २२ जुलैपासून म्हणजे आजपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही संघात 3 वनडे आणि 5 ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. आज सायंकाळी 8 वाजता वन डे सामना सुरू होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्याला क्वारंटाईन राहण्याची वेळ आली आहे. कोरोनाची लागण झालेला हा दिग्गज खेळाडू म्हणजे के. एल. राहुल आहे.
भारताचा उपकर्णधार लोकेश राहुलला कोरोना झाल्याचे आता समोर आले असून तो वेस्ट इंडिजमधील मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो बरा झाला होता आणि या आठवड्याच्या अखेरीस तो वेस्ट इंडिजला जाणार होता. राहुलला वेस्ट इंडिज मालिकेसाठी ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले होते. पण त्यासाठी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार होती. आता त्याला करोना झाल्याचे समोर आले असून विलगीकरणामध्ये 5 दिवस राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीत जर त्याचा अहवाल निगेटीव्ह आला तरच त्याची फिटनेस चाचणी होऊ शकते. त्यानंतर तो जर या चाचणीमध्ये पास झाला तरच त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाता येणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका २९ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन ट्वेन्टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत. पण वनडे आणि ट्वेन्टी-२० या सामन्यांच्या वेळा मात्र वेगवेगळ्या असणार आहेत. वनडे सामने हे २२, २४ आणि २६ जुलै या दिवशी खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या तिन्ही सामन्यांच्या वेळा सारख्याच असणार आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिन्ही वनडे सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहेत. या सामन्यांचा टॉस ७.३० वाजता होणार आहे. टॉसनंतर अर्ध्या तासानंतर प्रत्येक सामना सुरु करण्यात येणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी हा सामने डीडी स्पोर्ट्स-१ या वाहिनीवर लाइव्ह पाहता येणार आहेत.