(संगलट- खेड /इक्बाल जमादार)
खेड शहरालगत असलेल्या भडगाव येथे भल्या मोठ्या अजगराला पकडून छत्रपती वाइल्ड लाइफ फॉउंडेशनच्या सर्पमित्रांनी शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र सर्वेश पवार व त्याच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
खेड शहरालगत असलेल्या भडगाव ग्रामपंचायतीच्या परिसरात भला मोठा अजगर असल्याची खबर छत्रपती वाइल्ड लाइफ फॉउंडेशनचे सर्पमित्र सर्वेश पवार यांना मिळाल्यानंतर सर्वेश पवार हा आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ भडगाव येथे पोहचले. सर्वेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या परिसरात असलेल्या अजगराला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. हा अजगर सुमारे सात फूट लांबीचा असल्याचे सर्वेश यांने सांगितले.
आपल्याकडे कुठेही साप दिसला की त्याला लाठी, काठी घेऊन ठार मारले जाते. खरतर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या उंदरांना फस्त करण्याचे काम अजगारासारखे साप करता असतात. मात्र आपल्याला सापांबाबत आवश्यक ते ज्ञान नसल्याने साप दिसला रे दिसला की त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो. साप हा अतिशय घाबरट सरपटणारा प्राणी आहे. माणसाची जरासुद्धा चाहूल लागली तरी साप पळून जातो किंवा कुठेतरी लपून तरी बसतो. मात्र आपण त्याचा पाठलाग करून किंवा त्याला शोधून ठार मारतो. साप दिसला तर त्याला मारू नका, सर्पमित्रांना पाचारण करा, तो पर्यन्त त्याच्यावर लक्ष ठेवा. सर्पमित्र आल्यावर सापाला शिताफीने पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतील. त्यामुळे सापाला मारणे टाळा असे आवाहन सर्पमित्र सर्वेश पवार यांनी केले आहे.
आज भडगाव येथे अजगराला पकडण्याच्या मोहिमेत सुरेश जाधव, सर्वेश पवार, रोहन खेडेकर, अरविंद खेडेकर, स्वेत चौगुले, ओंकार बाईत हे सहभागी झाले होते.