(गणपतीपुळे/ वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुका शाखा यांचेवतीने “वर्षावास” या पवित्र बौद्ध धम्मीय कार्यक्रमाला आषाढी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे. या वर्षावास कार्यक्रमांतर्गत धम्म प्रवचन मालिका 9 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दिली आहे. रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे वर्षावस कार्यक्रम धार्मिक व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी संपन्न करण्यात येत होता मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही. त्यामुळे यंदा तालुक्यातील विविध गाव शाखांमधून हा कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने तालुका शाखेने गाववार शाखांची बैठक आयोजित करून त्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या निर्णयाला तालुक्यातील सर्वच गाव शाखांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शविल्याने यंदा विविध गावशाखांमध्ये वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातील पहिला शुभारंभाचा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या हॉलमध्ये तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्यानंतर या कार्यक्रमांतर्गत पानवल, करबुडे, रत्नागिरीआंबेडकरवाडी, सडामिऱ्या- आनंदनगर रत्नागिरी या ठिकाणी धम्मप्रवचन मालिका होणार असून अंतिम प्रवचन मालिका म्हणून आणि वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ रत्नागिरी तालुक्यातील 22 खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा या ठिकाणी होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, रत्नागिरी तालुका शाखेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती मुंबई कौन्सिलचे अतिरिक्त सचिटणीस रवींद्र पवार व चिटणीस श्रीधर साळवी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचेसमेवत तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे,कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, चिटणीस रविकांत पवार आदींसह उपसमित्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पहिल्या वर्षावास कार्यक्रमांतर्गत वर्षावास म्हणजे काय ?आणि त्याचे महत्त्व तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या गावशाखांचे दप्तरविषयक कामकाज कशाप्रकारे असले पाहिजे? याबाबत अतिशय मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका शाखेतील सर्व गावशाखांचे प्रतिनिधी व बहुसंख्य धम्म बांधव भगिनी उपस्थित होते. हा संपूर्ण वर्षावास कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी तालुका शाखेचे व संस्कर समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहेत.