अँड विलास पाटणे
जानेवारी 1971 च्या निवडणुकीपूर्वी बॅ. नाथ पैंना दोनदा हार्ट ॲटॅक येऊन गेलेला. नाथ पैंना प्रचाराची दगदग झेपण्यासारखी नव्हती. दरम्यान अपघातात जखमी झालेले कार्यकर्ते मुंज हे सिंधुदुर्गमधून पुढील उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरीला चालले होते. त्याच एस.टीने बॅ. नाथ पै रत्नागिरीत आले. दुस-या दिवशी त्यांना मुंबईत दशावतारी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनाला पोहोचायचे होते. राजापूर – बेळगांवमार्गे विमानाने नाथ पै मुंबई गाठणार होते. राजापूरला डॉ. प्रभात कुलकर्णी यांनी नाथ पैना तपासून संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला. शेवटी सल्ला न जुमानता नाथ पै 16 जानेवारीला बेळगांवहून मुंबईला रवाना झाले.
महोत्सवाचं उद्घाटन करुन, थोडा वेळ नाटक पाहून रात्रौ उशीरा त्यांचे मामा. डॉ. श्रीरंग आडारकर यांचेकडे मुक्कामाला गेले. त्या रात्री नाथ पै अस्वस्थ होतेच. सकाळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. तुळपुळे योगायोगाने विमानतळावर भेटले असता त्यांनी नाथ पैंना तपासून, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे अत्यावश्यक असल्याचा सल्ला दिला. परंतु ऐकतील तर नाथ पै कसले ?
बेळगांवचे डॉक्टर याळगी यांना निरोप गेल्यामुळे विमानतळावर ते हजर होते. नाथ पैंचा चेहरा पाहून डॉक्टर मनातून चरकले. सरतेशेवटी पडून विश्रांती घेण्याचा सल्ला नाथ पै यांनी नाईलाजास्तव मान्य केला. सायंकाळी हुतात्मा दिनाच्या सभेत 10 / 15 मिनिटांपेक्षा अधिक बोलू नये असा सल्ला डॉ. याळगी यांनी नाथ पै यांना दिला. परंतु नाथ पै बोलायला उभे राहिले आणि तब्बल 55 मिनिटे भावनाविवश होऊन बेळगावला न्याय देण्याकरिता अखेरपर्यंत प्रयत्न करेन असा शब्द दिला. नाथ पैंच्या आयुष्यातील ते शेवटचे भाषण ठरले. डॉ. याळगी यांच्या निवासस्थानी रात्रौ 12 वाजता त्यांना जाग आली. डॉ. याळगी यांनी तपासले. इंजेक्शन देण्यात आली. ऑक्सिजन लावण्यात आला. नाथ पै यांची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. डॉक्टरांना नाथ पै म्हणाले, “उद्या वेंगुर्ल्यात सभा आहे. मला गेले पाहिजे” 17 जानेवारी 1971 रोजी नाथ पै यांनी अखेरचा श्वास घेतला. जिभेवर सरस्वती असलेला प्रखर बुद्धिमत्तेचा, उत्कृष्ट संसदपटू, कोकणच्या जनतेची नाळ जुळलेला उमदा रसिक, सुसंस्कृत राजकारणी आणि समाजवादी विचारांचा निष्ठावान कार्यकर्ता गेला.
1957 ,1962 ,1967 च्या लोकसभेच्या तिन्ही निवडणुकांमध्ये राजापूर मतदारसंघातून प्रचंड मतानी कोकणी जनतेने नाथ पैना निवडून दिले अभ्यास, चिंतन , अमोध वक्तृत्व यामुळे लोकसभेतील त्यांची भाषण रंगत असत. शब्दावर हुकमत ,अनेक आंतरराष्ट्रीय संदर्भ , बोलण्यातील आत्मविश्वास त्यांच्या शब्दात जाणवत असे. प्रभावी वत्कृत्वाचा आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा इतिहास निर्माण करणारा खासदार . आपल्या कोकणच्या मातीतील होता याचा सार्थ अभिमान वाटतो
नाथ पैच्या कपात सुचनेमुळे कोकण रेल्वेचे सर्वेक्षण झाले आणि पुढे कोकण रेलवे आली. नाथ पै यांनी कोकणच्या माणसावर, मातीवर, निसर्गावर अतिशय प्रेम केलं. कॉलेजच्या काळात चिपळूणच्या पानगल्लीत खेडच्या म्युनिसिपल हॉलच्या मैदानावर नाथ पैंनी दिलेल्या भाषणाने आमच्या पिढीचं वैचारिक आयुष्य समृद्ध झालं. नाथ पैच्या भाषणात रसिकता आणि विद्वत्ता याच मनोज्ञ दर्शन असे. नाथ पैची सभा म्हणजे सारा माहोल मंतरलेला असायचा.
बॅ. नाथ पै यांना जीवनाचा अर्थ व प्रयोजन समजलं होतं. हाच वारसा त्यांच्या पत्नी क्रिस्टल पै यांनी जबाबदारीने सांभाळला. नाथ पैंच्या निधनानंतर निवडणूक निधीचे उरलेले घरामधील दहा हजार रुपये त्यांनी मधु दंडवते यांचेकडे सुपुर्द केले. तसेच, आग्रह होऊनही त्यांनी निवडणुकीत उभे राहण्यास नकार देऊन उदात्त परंपरेचे दर्शन घडविले. समाजवादी विचार, लोकशाहीवरील अविचल निष्ठा, सामान्य जनतेविषयी कळवळा असलेले बॅ. नाथ पै कुशाग्र बुद्धिमत्तेचे सुसंस्कृत नेते होते.
राजकारणातील सुसंस्कृतपणा ,प्रामाणिकपणा व सभ्यतेचे दीप मंदावत चालले असता बॅ नाथ पैची प्रकर्षने आठवण येते. बॅ. नाथ पैंच्या जन्मशताब्दीच्या शुभारंभाच्या निमित्ताने अभिवादन!