(रत्नागिरी)
आपली तत्त्व ठाम असावी लागतात आणि आचारात, विचारात बदल करायला हवा आहे. बदल घडवण्यासाठी मनापासून तयार व्हा. माझा विकास म्हणजे दुसऱ्याला त्रास नको, सर्वांचा विकास हवा. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरी लिहिली हा सुद्धा मोठा बदल आहे. लोकांसाठी लिहिले म्हणून ज्ञानेश्वरी लोकज्ञान झाले. अनेक लेखकांनी पुस्तकी ज्ञान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुढची पिढी नेहमीच आपल्यापेक्षा पुढे व अपडेट असते. मात्र त्यांच्यासमोर चांगल्या आदर्शांची आज गरज आहे. कारण मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो तरच हे शक्य आहे. तसेच आपण स्वतःपासूनच बदल घडवायला सुरवात केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चे विशेष पुरस्कार व विद्यार्थी गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी राणी लक्ष्मीबाई सभागृहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
छोट्या छोट्या गोष्टी आणि चिखलगावातील शाळेत केलेल्या उपक्रमांची माहिती देत बदल कसा स्वीकारूया याविषयावर त्यांनी सोप्या भाषेत विवेचन केले. त्या म्हणाल्या, आपली कुटुंब व्यवस्था टिकायला हवी आहे. तुम्ही स्वतःला सूचना द्या म्हणजे त्या स्वीकारायला शिकाल. मुलांना वाचा सांगताना आपण सुद्धा वाचले पाहिजे. त्याकरिता प्रत्येकाने योगदान द्यावे. परीक्षेतले गुण म्हणजे आयुष्य नाही. बदलांची टीम व्हायला हवी. बदल मनातून व्हायला हवा आणि स्वीकारायला शिकले पाहिजे. बदलासाठी घटना घडण्याची गरज असते व त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. तर आपल्याला चांगला माणूस म्हणून जगता येते.
या वेळी बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परीक्रमा पूर्ण केल्याबद्दल अमोघ पेंढारकर यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या चैतन्य पाध्ये याचा पुरस्कार आईने स्वीकारला. पुरस्कारप्राप्त तन्मय हर्डीकर आणि सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर हे दोघंही तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही मनोगत व्यक्त करून कऱ्हाडे संघाचे आभार मानले. हैद्राबादमध्ये २१ किमीची मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या राजीव टोळ्ये यांनाही यावेळी गौरवण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले. त्यांच्या वतीने रुद्रांश लोवलेकर याने मनोगत व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके आणि पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. जुई डिंगणकर हिने स्वागत गीत सादर केले. सौ. रेणुका मादुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.