देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथील पोस्ट कार्यालयातून आपली आर्थिक फसवणुक झाली असून संबंधित कर्मचाऱ्याकडून झालेल्या आर्थिक गैरप्रकाराची चौकशी व्हावी, अशी तक्रार सांगवे येथील रहिवासी विजय जयराम शेलार यांनी नुकतीच देवरुख पोस्ट कार्यालयात दिली आहे.
विजय जयराम शेलार हे सांगवे येथील रहिवासी असून त्यांची सांगवे येथील पोस्ट कार्यालयात दरमहा आरडी स्वरुपातील चार खाती सुरु आहेत. ते दरमहा त्या खात्यामध्ये पैशाची रक्कम भरणा करत असून त्यांच्या खाते बुकावर पोस्टचा शिक्काही मारण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी २०२२ पासून संबंधित आरडी खात्यावर पोस्टचा शिक्का मारुन रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र संबंधित पोस्टाला देण्यात आलेल्या मशीनव्दारे रक्कम भरणा झाली नसल्याचे विजय शेलार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सदरचा प्रकार निदर्शनास येताच तेथील पोस्टमन सुरेश गुरव यांनी तात्काळ (५ मार्च २०२२) विजय शेलार हे घरी नसताना त्यांची आई जयश्री शेलार यांच्याकडे पैशाची पुडी आणून दिली. यामध्ये १ हजार ६०० रुपये होते. सांगवे येथील पोस्ट कार्यालयातून झालेल्या या अनागोंदी कारभाराबाबत विजय शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त करत देवरुख पोस्ट कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार केली असून संबंधित गैरप्रकारात दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी असे तकारीत म्हटले आहे.