(संगमेश्वर)
गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सध्या सुरु आहे. लाखो चाकरमानी या सणाचा आनंद घेऊन मुंबईला गेले. या सणात प्रामुख्याने जाखडीच्या डबल बाऱ्या सर्वत्र सुरु असतात. पण पुर्ये गावात वैशिष्ट्य म्हणजे दत्तगुरु नमन मंडळ ओझरवाडी येथे नमनाची रियसल सुरु आहे. त्यांना या गणेशोत्सवातच पश्चिम महाराष्ट्रात कला सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. याचे श्रेय युवा शाहीर अक्षय भुवड याला जात असल्याचे या मंडळाने सांगितले.
प्रामुख्याने या कलेचा सिझन दिवाळी नंतर सुरु होतो, पण या मंडळाला गणपती पावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील यंदाच्या सिझन मधली ही पहिलीच सुपारी असल्याचे सांगतात.या संचामध्ये 35 ते 40 कलाकार काम करतात.हे मंडळ फार जुने आहे. काही काळापूर्वी शो बंद होते, मात्र मागील चार वर्षापासून पुन्हा या नमन मंडळाने ही आपली कला सुरु केली. विशेष म्हणजे मागील चार वर्षात 125 हुन अधिक शो झाले आहेत.आपल्या परिसरातील कलाकारांना एकत्रित घेऊन अक्षय भोवड याने ही परंपरा टिकवली आहे.
या मंडळाचे गुरु शाहीर वसंत भोवड,गंगाराम भोसले आहेत. शाहीर अक्षय भोवड आणि आकाश गोवरे आहेत तर या मंडळाला मार्गदर्शक म्हणून वसंत भोवड,भरत गोरुले,शाहीर संदीप सावंत, शाहीर गोपाळ करंडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.आपली ही कोकणची लोककला आपल्या नवीन पिढीने जपली पाहिजे व त्यांच्या नसानसात भिनली पाहिजे या हेतूने नमन पुन्हा सुरु केल्याचे अक्षयने सांगितले. तसेच या कलेविषयी सांगताना तो म्हणाला की, एकदा या कलेचे वारे अंगात भिनले तर ती कला विसरणे कठीण आहे. ही कला सादर करताना एक उत्साह अंगात संचारतो व माझ्यासह सर्व कलाकार देहभान विसरून काम करतात. तसेच माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वच कलाकारांची मला उत्तम साथ मिळते. त्यांच्यासुद्धा या यशाचे श्रेय जाते हे सांगायला तो विसरला नाही.
नमन प्रवास करताना व मेकअप सुरु असताना आमच्या सर्वांच्या गमतीजमती सुरु असतात. तसेच यंदा या सिझनच्या पहिल्या शो बद्दल सांगताना तो म्हणाला कि पश्चिम महाराष्ट भागात 7-8 शो या आधी झाले होते. त्यामुळे हे सर्व शो हाऊसफुल झाल्याने तेथील प्रेक्षकांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे एवढ्या लवकरची ही ऑर्डर मिळाली. तसेच या नमनाची वैशिष्ट्य म्हणजे वेळेचे नियोजन, बालकलाकारांचा सुंदर नृत्य अविष्कार,सुमधुर गायन अशी आहेत. या जोरावर त्यांनी आपला सर्वत्र डंका वाजविला आहे.
अक्षयने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली. त्यानंतर त्याने मुंबई येथील मोठमोठ्या हॉटेलमध्ये काम केले. मात्र पिज्झा, बर्गर,सॅन्डविच आदी पदार्थाची चव गावातील लोकांना मिळाली पाहिजे, या हेतूने गावात क्वालिटी या नावाने कॅफे सुरु केला. या सोबत नमन कला जोपसता यावी यासाठी नमन मंडळ सुरु केले. व्यवसाय व नमन कला यामध्ये सांगड घालताना धावपळ होत असल्याचे अक्षय म्हणाला, मात्र नमन कलेची आवड असल्याने नुकसान किंवा तोटा झाल्यासारखे वाटत नसल्याचे विनोदीरित्या म्हणाला. त्याचप्रमाणे उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय अधिक आधुनिकतेने करणार असून,ही कला जपण्यासाठी नवीन पिढीला प्रेरणा देणार असल्याचे अक्षयने सांगितले. तसेच कोणाला नमनाचा शो हवा असल्यास 83290 39300 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन अक्षयने केले.