[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
पाच रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या भीतीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. रत्नागिरी बाजारपेठेतील काही विक्रेते पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत. तर ग्रामीण भागातही पाच रुपयांच्या नोटा दुकानदार घेण्यास नकार देत आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेने ५ रुपयांच्या नोटा चलनातून बाद केलेल्या नाहीत तरीसुद्धा शहरांतील काही दुकानदार, भाजी विक्रेते या नोटा स्वीकारत नसल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरला नोटाबंदीनंतर १० रुपयांचे नवीन नाणे बाजारात आले. ते नाणे देखील अशाच पद्धतीने राज्यातील महत्वाच्या सिटीतील काही विक्रेते नाणी स्वीकारत नसल्याचे प्रकार समोर आले होते. तर अचानक नाण्यांचा ओघ वाढल्याने ती ठेवण्यास जागा नसल्याचे कारण देत काही बँकाही नाणी जमा करून घेण्यास नकार देत होत्या. यानंतर रिझर्व्ह बँकेने १० रुपयांची नाणी चलनात असून ती विक्रेते आणि ग्राहकांनाही स्वीकारणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. तसेच चलनातील नोटा नाकारणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो, अशी माहिती देखील त्यावेळी कायदेतज्ञांकडून देण्यात आली होती.
चलनातील पाच रुपयांच्या नोटा शक्यतो किराणा मालाचे दुकान, बेकरी, भाजीवाले, पानटपरी, चहाचे दुकान, वडापावची गाडी इत्यादी दुकानात नोट घेण्यास टाळाटाळ करतात. दुसरीकडून सुट्या पैशांची व्यापाऱ्यांना चणचण भासत असते. तर एखाद्या ग्राहकाकडून पाच रुपयाची नोट दुकानदाराने नाकारल्यावर ती वस्तू न घेतच त्या ग्राहकाला परतावे लागते. शहराच्या आसपास ग्रामीण भागातही पाच रुपयांच्या नोटा घेतल्या जात नाही. त्यामुळे सुट्या पैशाची टंचाई अधिकच जाणवत आहे.
प्रश्न कधी सुटणार?
ऑनलाईन व्यवहारामुळे हा प्रश्न शहरामध्ये सहज सुटतो; पण ग्रामीण भागामध्ये लोकांना पैशाशिवाय पर्याय नसतो. आठवडे बाजारात भाजीवाल्यांना विक्रेत्यांना सुट्या पैशांसाठी एकमेकांवर अवलंबून रहावे लागते. किंवा पाच रुपयांसाठी गिऱ्हाईक सोडावे लागते. तरी ही समस्या लवकरात लवकर प्रशासनाने सोडविण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शहरातील अनेक दुकानात पाच रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे मी स्वतः बघितले आहे. नोट का घेत नाही असे विचारल्यावर दुकानदार काहीच सांगत नाहीत मात्र दुसरा कॉइन द्या असे सांगून पाच रुपयाची नोट घेतली जात नाही. चलनातून या नोटा बाद केल्या असतील तर प्रशासनानं तसे जाहीर करावे व लोकांची शंका दूर करावी.
– इस्माईल मुकादम, व्यवसायिक