(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक स्थितीत असलेले शिल्लक काम मार्गी लावण्यासाठी गेले 16 दिवस दुपारी 12 ते सायंकाळी 5 यावेळेत वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यानी दिलेली मुदत बुधवारी रात्री संपुष्टात आली. कंत्राटदार कंपनीने आणखी दहा दिवस मागितलेली मुदत नाकारण्यात आल्याने आज गुरूवारपासून घाटातील वाहतूक नियमितपणे 24 तास खुली राहणार आहे. गेल्या 16 दिवसांत घाटातील शिल्लक काम पूर्णत्वास गेले असल्याची माहिती महामार्ग अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
एकूण 5.40 किलोमीटरच्या परशुराम घाटातील बहुतांशी काँकिटीकरण पूर्ण झाले असून वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. उर्वरीत परशुराम माथ्यावरील 1.20 किलोमीटरच्या अंतरातील धोकादायक डोंगर उतार व दरडीमुळे तेथील काम अडचणीचे बनले होते. त्यातच डोंगराच्या बाजूने 22 मीटर ऊंचीची भिंत असल्याने व त्यात मुरूमाची माती व भलेमोठे दगड असल्याने वाहतूक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत असल्याने कंत्राटदार कंपनीने सलग काही दिवस परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवून उर्वरीत चौपदरीकरणातील कामाला वेग देण्याची मागणी जिल्हाधि कारी यांजकडे केली होती. त्यानुसार गेल्या 16 दिवसांपासून घाटातील वाहतूक बंद ठेवून शिल्लक काम करण्यात येत होते. या कालावधीत वाहतूक पर्यायी म्हणजा चिरणी-आंबडस-लोटे मार्गे वळवण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या 16 दिवसांत संरक्षक भिंतीसह धोकादायक ठिकाणो मातीकाम, भरावाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता उर्वरीत काँकिटीकरण करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पावसाळ्यापूवीं घाटातील एक लेन पूर्णपणे वाहतुकीस खुली होणार आहे.