(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील परचूरी बावनदी पात्रात काल १५ एप्रिल रोजी पुन्हा एकदा १ जण बुडाल्याची घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. शिवाजी पांडुरंग लिंगायत (५२, परचुरी) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लिंगायत बुडाल्याची माहिती परचुरी गावात पसरल्यानंतर सर्वजण शोध घेण्यासाठी नदी पात्राजवळ जमले होते. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह हाती न लागल्यामुळे आज पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात झाली. यावेळी हा मृतदेह कोळंबे येथील पुलाच्या वरच्या बाजूला सापडून आला.
पोलिसांनी हा मृतदेह पंचनामा करून वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. लिंगायत हे कोळंबे मार्गे ब्रीजवरुन परचुरीमध्ये गेले असते तर कदाचित जीव वाचला असता. शॉर्टकट मारण्यात त्यांंना आपला जीव गमावावा लागल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. दरवर्षी होणार्या पुरामुळे बावनदी पाण्याच्या प्रवाहात बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी शॉर्टकटचा अवलंब करुन नदीतून न जाता कोळंबे ब्रीज, वांद्री-उक्षी ब्रीज यांचा वापर करावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, लिंगायत हे सोनगिरी येथे नातेवाईकांकडे गेले होते. तिथून ते आपल्या घरी परतत असताना बावनदिला ओहोटी असल्याने त्यांनी नदीतून जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. नदीतून घरी जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना लिंगायत बुडाल्याची माहिती मिळताच या ठिकाणी जमा झाले. कोणी होडीच्या सहाय्याने तर कोणी नदीच्या किनाऱ्यावर शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते दिसून आले नाही.
या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिस स्थानकात देण्यात आली. संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, पोलिस अमलदार सागर मुरुडकर, सचिन कामेरकर, हेड कॉन्स्टेबल मसुरकर, कोंदल, यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी शोध कार्याला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती न लागल्याने आज सकाळी 7.30 वा. च्या सुमारास पुन्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुन्हा शोध कार्याला सुरुवात झाली. शोध घेत असताना लिंगायत यांचा मृतदेह दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह नदी किनाऱ्यावर आणण्यात आला. त्यानंतर उत्तरीय तपासणी साठी वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. शव विच्छेदननंतर मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला.