(संगलट / इक्बाल जमादार)
ज्या पदावर आपण आहोत ते शिवसेनेमुळे, त्यामुळे त्याच्याशी एकनिष्ठ राहा, मात्र नुसते एकनिष्ठ राहून घरात बसून शिवसेना विजयी होणार नाही यासाठी घराबाहेर पडा. पदावर आहात तर कामे करा नाहीतर बाजूला व्हा, असे खडे बोल माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यानी पेण येथ शिवसेना कार्यकर्त्यांना सुनावले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पेणमध्ये झाला. या मेळाव्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांची एकमेकांनीच कानउघाडणी केली, अनंत गीते यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी करून उपस्थित पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ज्या पदावर आपण आहोत ते शिवसेनेमुळे, त्यामुळे त्याच्याशी एकनिष्ठ राहा, मात्र नुसते एकनिष्ठ राहून घरात बसून शिवसेना विजयी होणार नाही यासाठी घराबाहेर पडा. शिवसेनेचे विचार समाजात पोहोचवा. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पायउतार झाले तेव्हा खऱ्या शिवसेनेला आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही दुःख झाले. परंतु त्यांना या खुर्चीत परत बसवायचे असेल तर शिवसेनेची सत्ता यायला हवी म्हणून आपण आपली पदे घेऊन घरी न बसता गावबैठका घ्या, चर्चासत्र सुरू करा, होऊ द्या चर्चा सारखे उपक्रम राबवा असेही अनंत गीते यांनी पेण येथील मेळाव्यात सूचनावजा उपदेश दिले. पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याने पदाधिकारी मात्र काही वेळ गप्प राहिले.
या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर जैन, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, जगदीश ठाकुर, नरेश गावंड, अविनाश म्हात्रे, सुधा भोय यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात कार्यकर्ते मात्र संख्येने कमी होते. सुरुवातीपासूनच मेळाव्यात प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपण केलेल्या कार्याचा पाढा वाचला तर दुसऱ्यांवर कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला. आपण जे पदाधिकारी आहात ते शिवसेनेमुळे आणि या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही पदावर आहात हे ध्यानात ठेवा. जर पदावर राहून काम करायचे नसेल तर सरळ बाजूला व्हा, दुसरा काम करायला तेथे तयार आहे, शिवसेना नेते अनंत गीते यांनी सांगितले.
पक्षातील मरगळ बाजूल झटका, उदासीनता काढा, एकमेकांच तंगड्या खेचू नका, सर्वांनी कामात लागा अशा सूचना त्यांनी दिल्या. मेळाव्यात अनंत गीते यांनी आगामी यश हे आपलेच आहे, त्यासाठी कामाला लागा अशा सूचनाही दिल्या. इंडिया आघाडी आपल्यासोबत आहे याचाही आपण फायदा घ्या आणि पुढच्या लोकसभेला, विधानसभेला शिवसेना कशी सत्तेत येईल याचे नियोजन करा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी या मेळाव्यातून दिल्या.