(नवी दिल्ली)
देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये १२ वीनंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच पदवीसाठी चार वर्षे लागणार आहेत. म्हणजेच हा अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून चार वर्षांचा करण्यात येणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये ४५ केंद्रीय विद्यापीठांचादेखील समावेश आहे अशी माहिती यूजीसीच्या अध्यक्षांनी दिली.
पुढील शैक्षणिक वर्षापासून बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील, त्यांना डिग्री मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. यूजीसीने यासाठी चार वर्षांचा ग्रॅज्युएशन प्रोग्रॅमचा फ्रेमवर्क निश्चित केला आहे. केंद्रीय विश्वविद्यालयासह राज्य स्तरावरील आणि खाजगी विश्वविद्यालयेदेखील चार वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स करणार आहेत. देशातील अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झाली आहेत.
विद्यार्थ्यांकडे ३ वर्षांत डिग्री मिळविण्याचा पर्यायही खुला असणार आहे. हा पर्याय या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांच्यासाठी असणार आहे. तसेच हे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीदेखील अपग्रेड करू शकतात. तसेच जे विद्यार्थी आता पहिल्या, दुस-या वर्षाला आहेत, तेदेखील हा पर्याय निवडू शकतात.
चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठे त्यांच्या स्तरावर काही नियमही बनवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे, त्यांना पीजी किंवा एमफिलसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ५५ टक्के गुण असणे गरजेचे असणार आहे. तसेच आता एमफिलसाठी विद्यार्थी खूप काळ घेऊ शकणार नाहीत.