(मुंबई)
बॉलिवूडची कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत हिने आदिल दुर्राणीसोबतचे लग्न मोडल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत होती. काहीच दिवसांपूर्वी तिने बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. मात्र, आता तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप करत त्याच्यापासून वेगळी झाल्याचे म्हटले आहेत. आदिलने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपला वापर केल्याचे राखी म्हणाली आहे.
राखीने मीडियाशी संवाद साधताना आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी राखी म्हणाली की, ‘आता सगळं टेन्शन संपलं आहे. आदिलने दुसऱ्या मुलीसोबतच संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याचा निर्णय मला सांगितला आहे. त्यामुळे मी आता माझ्या हक्कासाठी लढणार आहे.’ यावेळी आदिलवर आरोप करताना राखी म्हणाली की, गेल्या आठ महिन्यांच्या लग्नात आतापर्यंत आदिलचे चार अफेअर झाले. प्रत्येकवेळा राखीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
आदिलवर अनेक गुन्हे दाखल असल्याचे देखील आपल्याला माहित नव्हते, असे राखी यावेळी म्हणाली आहे. यासोबतच तिने आदिलवर पैसे उकळल्याचे आरोप देखील केले आहेत. राखी म्हणाली की, आदिलने बिझनेस सुरू करण्यासाठी तिच्याकडून १.५ कोटी रुपये घेतले होते. याशिवाय जेव्हा राखी बिग बॉस मराठीच्या घरात आली, तेव्हा तिने आपल्या आईच्या उपचारांसाठी आदिलकडे काही पैसे दिले होते. आपण दिलेले पैसे आपल्या आईपर्यंत पोहोचलेच नाहीत, असे तिने म्हटले आहे.
आदिलने केवळ बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपला वापर केला असून, आता त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे, असे राखीने म्हटले. आदिलने आपला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप देखील तिने केला आहे. आपण दिलेले पैसे देखील आदिल आता परत करण्यास नकार देत असून, आता मी कायदेशीर प्रक्रिया करून पैसे परत मिळवणार, असे राखी सावंतने म्हटले आहे.