(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यामधील राजकारण ढवळून निघाले आहे. पवारांनी राजीनाम्याबाबत सध्या संयमी भूमिका घेतली आहे. मात्र पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. पवार आता दोन दिवसांनी नवीन भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आलेली आहेत. या नावांमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांचंच नाव सर्वात आघाडीवर असल्याचे दिसते. परंतु अजित पवार यांना आज याबाबत विचारलं असता त्यांनी यासाठी सपशेल नकार दिला.
शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला नाही तर तुम्ही अध्यक्ष होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, माझा अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरीही मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. माझा तसा विचार नाही, मी त्या पदावर कामही करु शकत नाही; अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचा अध्यक्ष आज ठरणार, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
पवारांच्या निवृत्तीनंतर नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी त्यांनी एक समिती जाहीर केली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. या समितीची आज शुक्रवार, ५ मे रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी समिती मागणी करणार आहे. पण जर पवारांनी निर्णय मागे घेतला नाही, तर नवा अध्यक्ष निवडीचे आव्हान समितीपुढे असणार आहे. सुप्रिया सुळे यांनी देश पातळीवर काम करावे तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्याकडे पक्ष सोपवावा, असे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले होते.