नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या चार जणांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला खासदार रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र, नवीन खातेवाटपानुसार रावसाहेब दानवे यांना बढती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजप नेते नारायण राणे यांना कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नारायण राणे यांनी सर्वांत आधी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून नारायण राणे यांना महत्त्वाचे खाते मिळेल, असा कयास बांधला जात होता. नव्या मंत्र्यांचे खाते वाटपही जाहीर झाले असून, यामध्ये नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात असून, रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.