(नवी दिल्ली)
देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. याचा देशभर जल्लोष सुरू आहे. तसेच राज्यातही जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. यावेळी दादर, नरिमन पॉइंट येथे भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, नेते यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.
मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या कोटमी या गावामध्ये आदिवासी बांधवांनीही जल्लोष केला. कोटमी या गावामध्ये आदीवासी बांधवांनी आदिवासी नृत्य करून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा आणि त्यांच्या समर्थकांनी मेळघाटमध्ये जोरदार जल्लोष साजरा केला.
आमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थाबाहेर आयोजित कार्यक्रमात आदिवासी महिलांनीही डान्स केला. आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते यावेळी जिल्ह्यातील 50 आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. तर जळगाव जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यातर्फे अभिनंदनचे बॅनर लावून शुभेच्छा देण्यात आल्या. भव्य शोभा यात्राही काढण्यात आली. दिल्लीच्या चौकाचौकात द्रौपदी मुर्मु यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावले गेले आहेत.